
भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत
साप्ताहिक सागर आदित्य
भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत
जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिम, शासनाने भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी महसूल व वनविभागाच्या अधिसुचनेनुसार दि.४ मार्च २०२५ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात सुचना जारी करण्यात आली आहे.त्यानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करणाऱ्यांना विशेष सवलत मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
*सवलतीचे मुख्य मुद्दे*:
कृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ धारणाधिकार किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरणासाठी अधिमूल्य रक्कमेत ३१ डिसेंबर पर्यंत सवलत मिळणार आहे.
नगरपंचायत/नगरपरिषद/ विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीबाहेरील कृषी प्रयोजनासाठी ज्या जमिनी शेती / ना विकास वापर विभागात स्थित आहेत.अश्या जमिनी रुपांतरणासाठी शेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किंमतीच्या २५ % रक्कम आकारली जाणार आहे. ३१ डिसेंबर नंतर सदर रक्कम ७५% आकारली जाईल.
ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात अकृषिक (बिनशेती) विभागात स्थित आहेत अश्या जमिनीच्या रुपांतरणासाठी बिनशेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ५० टक्के रक्कम आकारली जाणार आहे. ३१ डिसेंबर नंतर सदर रक्कम ७५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे.
कृषि प्रयोजनासाठी धारण केलेल्या व सद्यस्थितीत नगरपंचायत/ नगरपरिषद/ विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये स्थित असलेल्या बिनशेती वापर विभागात स्थित नाही अश्या जमिनीच्या रुपांतरणासाठी येणाऱ्या किमतीच्या २५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे.३१ डिसेंबर नंतर सदर रक्कम ७५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे. ज्या जमिनी बिनशेती वापर विभागात स्थित आहेत अश्या जमिनीच्या रुपांतरणासाठी येणाऱ्या दराप्रमाणे किमतीच्या ५० टक्के रक्कम आकारली जाणार आहे. ३१ डिसेंबर नंतर ७५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे.
निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ धारणाधिकारावर किंवा भाडे पट्ट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर वापर विभागात अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर पर्यंत अधिमूल्य रकमेत सवलत मिळणार आहे.
त्यामध्ये वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी कब्जेहक्काने किंवा भाडे पट्ट्याने धारण केलेल्या जमिनीचे रुपांतरण करण्यासाठी येणाऱ्या किमतीच्या ५० टक्के रक्कम आकारली जाणार आहे.३१ डिसेंबर नंतर ६० टक्के रक्कम आकारली जाणार आहे.
रहिवासी प्रयोजनासाठी कब्जेहक्काने वैयक्तिक जमिनीचे रुपांतरण करण्यासाठी येणाऱ्या किमतीच्या १५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे.३१ डिसेंबर नंतर ६० टक्के रक्कम आकारली जाणार आहे. रहिवासी प्रयोजनासाठी भाडे पट्ट्याने धारण केलेल्या जमिनीचे रुपांतरण करण्यासाठी येणाऱ्या किमतीच्या २५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे.३१ डिसेंबर नंतर ७५ टक्के रक्कम आकारली जाणार आहे.सदर अधिसूचनेतील तरतुदी या सिलिंग कायद्या अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींना लागू होणार नाही.
*अर्जाची प्रक्रिया*:
तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करा. अर्जासोबत जमीन दस्ताऐवज, नकाशा, भोगवटादार वर्ग-२ प्रमाणपत्र आणि अधिमूल्य रक्कम भरण्याचा पुरावा जोडावा. अधिक माहितीसाठी महसूल व वनविभागाची दि.४ मार्च २०२५ रोजीची अधिसूचना संग्रही ठेवावी.असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
“ शासनाने वर्ग–२ जमिनीचे वर्ग–१ रूपांतरणासाठी जाहीर केलेला हा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे अनेकांना त्यांच्या जमिनीवरील कायमस्वरूपी मालकी हक्क मिळणार असून नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी अर्ज सादर करून शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा.”
योगेश कुंभेजकर
जिल्हाधिकारी, वाशिम
0 Response to "भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत"
Post a Comment