-->

अनुकंपा नियुक्ती व लिपीक टंकलेखक भरती जिल्हास्तरीय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

अनुकंपा नियुक्ती व लिपीक टंकलेखक भरती जिल्हास्तरीय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न



साप्ताहिक सागर आदित्य 

शासकीय सेवेत आपल्या कार्यातून प्रशासनात मौल्यान्वित योगदान द्यावे 

       पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे


 सेवाभावाने कार्य करून प्रशासनाचा चेहरा उजळवा 

     जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 


अनुकंपा नियुक्ती व लिपीक टंकलेखक भरती जिल्हास्तरीय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न 


वाशिम, दि. ४ ऑक्टोबर   शासकीय सेवेत रुजू होत असताना नागरिकाभिमुख, जबाबदार आणि कार्यक्षम अशा भावनेने कार्य करा. शासनाने निर्माण केलेल्या संधींचा उपयोग समाजहितासाठी करा आणि आपल्या कार्यातून प्रशासनात मौल्यान्वित योगदान द्यावे. असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.

त्यांनी पुढे असेही सांगितले की, शासनाची सेवा ही केवळ नोकरी नसून समाजसेवेचे माध्यम आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कार्यातून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे. पारदर्शकता, तत्परता आणि प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारे काम केल्यास शासनव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल.

    मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्वसमावेशक सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार ४९ उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त ४६ उमेदवारांच्या नियुक्तीपत्र  वितरणाचा  जिल्हास्तरीय  रोजगार मेळावा दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम (नियोजन भवन समिती सभागृह) येथे आयोजित करण्यात आला.यावेळी राज्याचे कृषीमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे दूरदृष्यप्रणालीव्दारे बोलत होते.यावेळी त्यांनी  नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

   व्यासपीठावर विधानसभा सदस्य आ. श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी,आत्माराम बोंद्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल कावरखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    प्रास्ताविक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. ते म्हणाले, शासनाच्या सर्वसमावेशक अनुकंपा भरती धोरणाच्या अंमलबजावणीमुळे वाशिम जिल्ह्यात आज एकाचवेळी ९७ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये अनुकंपा भरतीअंतर्गत ४९ उमेदवार व एमपीएससी तर्फे निवड झालेल्या ४८ उमेदवारांचा समावेश आहे.

१७ जुलै २०२५ रोजी शासनाने जारी केलेल्या नवीन अनुकंपा भरती शासन निर्णयामुळे विविध विभागांतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीची प्रक्रिया गतीमान झाली आहे. पूर्वी रिक्त पदांचा अभाव व विभागीय समन्वय नसल्याने उमेदवारांना अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती. आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सर्व विभागांकडील रिक्त पदांची एकत्रित माहिती घेऊन समुपदेशनाद्वारे उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार नियुक्ती देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वाशिम जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये २० राज्य शासनाचे, २० जिल्हा परिषदेचे व ९ पोलीस विभागातील अशा ४९ उमेदवारांना अनुकंपा भरतीतून नियुक्ती दिली जात आहे. त्याचबरोबर एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक भरतीअंतर्गत ४८ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या शासन निर्णयामुळे गट-ड पदांसाठीची २० टक्के मर्यादा शिथिल करण्यात आल्याने गट-ड वेटिंग लिस्टमधील उमेदवारांनाही संधी मिळाली आहे.

      जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शासकीय सेवेत येत असताना ‘एकदा नोकरी मिळाली की आयुष्य सेट’ अशी चुकीची संकल्पना टाळावी. शासन सेवांमध्ये आता परफॉर्मन्स, ई-ऑफिस, ऑनलाईन सेवा वितरण व तंत्रज्ञानाचा वापर यावर भर आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने सतत अभ्यास करून स्वतःला अद्ययावत ठेवावे.

त्यांनी नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना “आय-गोट (iGOT)” या केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवरील कोर्सेस पूर्ण करण्याचे आवाहन केले आणि “आपल्या कुटुंबातील दिवंगत सदस्यांच्या आठवणीप्रमाणे आपण आपल्या कार्यातून सकारात्मक योगदान द्यावे,असे सांगितले.


     सिईओ म्हणाले, जिल्हा परिषदेतून आज एकूण ४० उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येत आहेत. यामध्ये २० सरळसेवा मधील, १८ वर्ग ‘क’ आणि २ वर्ग ‘ड’ चे लाभार्थी आहेत.जिल्हा परिषदेची ही नियुक्ती प्रक्रिया नियमितपणे पार पडत असते. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात ही प्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे या वेळेस लाभार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे, कारण आमच्या आस्थापनेनुसार  पदांची उपलब्धता मर्यादित आहे. मात्र आमच्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात एकूण २० पदांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात येत आहेत. काही पदांसंदर्भात जीआर (शासन निर्णय) मध्ये स्पष्टता नसल्यामुळे त्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. पुढील एक-दोन आठवड्यांत आणखी काही (३ ते ५) उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.आपण आता शासन व्यवस्थेचा भाग होत आहात, त्यामुळे आपल्या कामकाजातून जनतेचा विश्वास जपावा, ही अपेक्षा आहे.


       एसपी म्हणाले, आजपासून आपण शासनाचा अविभाज्य भाग होत आहात. कालपर्यंत आपण सेवा घेणारे होतात, आता सेवा देणारे बनणार आहात. त्यामुळे तुमच्यावरची जबाबदारी शंभर पटीने वाढली आहे.पोलीस अधीक्षकांनी शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, शासन सेवेत काम करताना शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेची भावना अत्यावश्यक आहे. सुट्ट्या हा हक्क नसून सेवा हे आपले कर्तव्य आहे, ही जाणीव नेहमी मनात ठेवा. अनुकंपा भरतीतून रुजू झालेल्या उमेदवारांना उद्देशून त्यांनी सांगितले की, ज्यांच्या जागी आपण नियुक्त झाले आहात, त्यांचे नाव अधिक उज्ज्वल करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. तसेच एमपीएससीतून थेट निवड झालेल्यांना उद्देशून त्यांनी म्हटले की, तुम्ही महाराष्ट्रातील कठीण परीक्षांपैकी एक उत्तीर्ण होऊन येथे आला आहात, त्यामुळे तुमच्याकडून उत्कृष्ट कार्याची अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले, पहिले सहा महिने हे तुमच्या कारकिर्दीचे पाया आहेत. या काळात जितकं शिकता येईल तितकं शिका, कारण प्रशिक्षणात मिळालेलं ज्ञान पुढील संपूर्ण सेवेत उपयोगी पडतं. शेवटी त्यांनी उपस्थित पालकांचे अभिनंदन करत सांगितले, आपल्या पाल्याला सक्षम बनवून आज शासन सेवेत रुजू होण्यास समर्थ केल्याबद्दल आपण अभिमानास पात्र आहात.


आ. खोडे म्हणाले की, जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर अचानक संकट येते आणि त्या कुटुंबाची परिस्थिती बिकट होते, तेव्हा शासनाकडून त्यांच्या मनात अपेक्षा असते की त्यांच्या वडिलांच्या किंवा आईच्या जागेवर कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळावी. अशा अनेक कुटुंबांच्या आशा वर्षानुवर्ष शासनाच्या कार्यालयात चकरा मारत राहिल्या. काही वेळा तर असेही घडले की, संबंधित कर्मचारी कुटुंबातील सदस्य त्या प्रतीक्षेतच हयात राहिले नाहीत.

शासनाने या सर्व बाबी गांभीर्याने घेतल्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी खरा आधार आहे. भविष्यात जर अशा दुर्दैवी घटना घडल्या तर त्या कुटुंबांना आता जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, ही दिलासादायक बाब आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आज ज्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली आहे, त्यांनी आपल्या कुटुंबाचा आधार ठरावे. आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपासून कधीही दूर जाऊ नये. शासनात कार्य करताना अनुशासन, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ही आपली ओळख असावी. शासनाविषयी कोणतीही तक्रार होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या कामात दक्षता घ्यावी.

आपल्या सर्वांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. तसेच, महाराष्ट्र शासनाचेही अभिनंदन करतो की त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेऊन संपूर्ण राज्यात दहा हजार अनुकंपा नियुक्त्या उपलब्ध करून दिल्या.


      राज्यात आज ५ हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना, तसेच ५ हजार १२२ एमपीएससी उमेदवारांना अशा एकूण १०,३०९ उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्याचे थेट प्रक्षेपण नियोजनभवनात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आले. यादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनुकंपा धोरणांतर्गत  व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त नियुक्तीपत्र  वितरण करण्यात आले. 

यावेळी उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले.राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


 या मेळाव्याला लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक, पालक, विविध विभागाचे नियुक्ती प्राधिकारी , अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.संचालन शाहू भगत यांनी केले. आभार आरडीसी विश्वनाथ घुगे यांनी मानले.

0 Response to "अनुकंपा नियुक्ती व लिपीक टंकलेखक भरती जिल्हास्तरीय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article