
सैनिकांचा त्याग समाजासाठी आदर्शवत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
सैनिकांचा त्याग समाजासाठी आदर्शवत
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
शौर्य दिन उत्साहात साजरा
वाशिम, दि. २९ सप्टेंबर देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे देश सुरक्षित व सक्षमपणे वाटचाल करत आहे. जिल्हा प्रशासन माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे आणि त्यांची सेवा, त्याग सदैव स्मरणात ठेवली जाईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे, कल्याण संघटक संजय यलमर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री . कुंभेजकर बोलत होते.
जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय सैन्य दलाने दि. २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तान हद्यीत शिरून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला होता.भारतीय सैन्याची अभिमानास्पद कामगिरी जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचविण्यासाठी दरवर्षी शौर्यदिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने माजी सैनिक, शहिद जवानांच्या विरपत्नी, विरमाता, वीरपिता आणि शौर्य पदकधारकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोमल नवघरे यांना सदनिका खरेदी करीता दीड लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
श्री.कुंभेजकर यांनी शहिदांच्या स्मृतीचिन्हास पुष्पहार अर्पण केला व शहिदांना सामुहिक अभिवादन
करण्यात आले. यावेळी भारत पाकिस्तान युध्दात १२ सप्टेंबर १९६५ रोजी शहिद झालेले शिपाई यशवंत सरकटे यांच्या विरपत्नी शांताबाई सरकटे व जम्मु कश्मिरमध्ये आतंकवादयाविरुद्धच्या ऑपरेशन
मोहिमेत ११ डिसेंबर १९९४ रोजी आर्टिलरी
रेजीमेंटचे शहिद झालेले शिपाई दगडु लहाने
यांच्या विरपत्नी श्रीमती पार्वतीबाई लहाने ,श्रीमती वैशाली अमोल गोरे,वीरपत्नी मिराबाई भोगराज नागुलकर यांचा शाल व श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपीक शिवशंकर झाडोकार, कल्याण संघटक संजय यलमर, लिपिक माणिक इंगळे व विष्णू घुगे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील
कर्मचारीवृंद,माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
0 Response to "सैनिकांचा त्याग समाजासाठी आदर्शवत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर "
Post a Comment