
नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देऊ पालकमंत्र्यांची ग्वाही
साप्ताहिक सागर आदित्य
नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देऊ
पालकमंत्र्यांची ग्वाही
वाशिम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक अहवालानुसार, वाशिम तालुक्यात ९८ गावे बाधित होऊन ३९,३१० हेक्टर क्षेत्रावर, रिसोड तालुक्यात ८५ गावे बाधित होऊन ४८,६४५ हेक्टर क्षेत्रावर, मालेगाव तालुक्यात १२७ गावे बाधित होऊन ५०,३११ हेक्टर क्षेत्रावर, मंगरूळपीर तालुक्यात ७४ गावे बाधित होऊन १०,४८९ हेक्टर क्षेत्रावर, कारंजा तालुक्यात १ गाव बाधित होऊन ५.९९ हेक्टर क्षेत्रावर तर मानोरा तालुक्यात ६ गावे बाधित होऊन १८५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
वाशिम तालुक्यात ३, रिसोड तालुक्यात २ जनावरे व ३ हजार कोंबड्या, मालेगाव तालुक्यात १४ तर मंगरूळपिर तालुक्यात १६ अशा एकूण ३५ जनावरे आणि ३ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. घरांच्या पडझडीत वाशिम तालुक्यात ९७, रिसोड तालुक्यात १८४, मालेगाव तालुक्यात ७२ आणि मंगरूळपिर तालुक्यात ५१ अशा एकूण ४०४ घरांची अंशतः पडझड झाली आहे. जमिनीच्या नुकसानीत वाशिम तालुक्यातील ७ गावांमध्ये १६१ हेक्टर तर मालेगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ६७ हेक्टर जमिनीचे नुकसान होऊन एकूण २२८ हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकरी बांधवांनी धैर्य सोडू नये. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनामे तातडीने करून मदत व नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू असून मी स्वतः यावर लक्ष ठेवून आहे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
0 Response to "नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देऊ पालकमंत्र्यांची ग्वाही"
Post a Comment