
"वत्सगुल्म शेतकरी संवाद" उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
साप्ताहिक सागर आदित्य
शेतीविषयक वादांचे लवकर निरसन करण्यासाठी
"वत्सगुल्म शेतकरी संवाद" उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
वाशिम, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पाण्याचे हक्क, पाट, शेतरस्ते यांसारख्या विविध शेतीविषयक कारणांवरून अनेकदा वाद निर्माण होतात. काही वेळा हे वाद इतके टोकाचे होतात की गंभीर गुन्ह्यांत रूपांतर होऊन सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्थेलाही धोका निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर, वाशिमचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी वत्सगुल्म शेतकरी संवाद या नावाने अभिनव उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडली असून, याची प्रभावी अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात दर सोमवारी दुपारी १२ ते १ या वेळेत बैठकांचे आयोजन करण्यात येते. या बैठकीत संबंधित तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तसेच भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक हे एकत्रितपणे उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतात व त्यावर संयुक्त निर्णय घेऊन तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले जातात.
या उपक्रमाचा शुभारंभ २३ जून २०२५ पासून करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त प्रयत्नामुळे नागरिकांचा विश्वास वाढीस लागला आहे. वादांच्या सुरुवातीलाच प्रशासनाकडून लक्ष दिल्यामुळे गंभीर गुन्ह्यांचा संभाव्य धोका टाळला जात आहे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम साधला जात आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांचे लवकर निरसन होणे, प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे, हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतीविषयक तक्रारी, अडचणी असतील त्यांनी प्रत्येक सोमवारी संबंधित तहसील कार्यालयात वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक वाशिम यांनी केले आहे.
0 Response to ""वत्सगुल्म शेतकरी संवाद" उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी"
Post a Comment