-->

 नालंदानगरात पाणीटंचाई, मुख्याधिकार्‍यांची बेपर्वाई, भीमसंग्रामने सुरू केली उपोषणाची लढाई

नालंदानगरात पाणीटंचाई, मुख्याधिकार्‍यांची बेपर्वाई, भीमसंग्रामने सुरू केली उपोषणाची लढाई



साप्ताहिक सागर आदित्य 

नालंदानगरात पाणीटंचाई, मुख्याधिकार्‍यांची बेपर्वाई, भीमसंग्रामने सुरू केली उपोषणाची लढाई


वाशिम - श्रमिक वस्ती असलेल्या नालंदानगरातील अर्ध्या भागात मोठी पाईपलाईन बसवण्यात आलेली नाही. नगर परिषदेच्या जुन्या पाईपलाईनमधून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नागरिकांना पदरचे पैसे खर्चून पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागात त्वरित मोठी पाईपलाईन बसवून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी भीमसंग्राम सामाजिक संघटनेने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.


सोमवार, २४ मार्च रोजी संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष माया रमेश वाठोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य महिलांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्‍यांना आमरण उपोषणाच्या इशार्‍याचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद आहे की, सर्व जनतेला स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हे शासनाचे धोरण आहे. यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून प्रत्येक शहरात जलकुंभ आणि पाईपलाईनचे जाळे विस्तारण्यात आले आहे. असे असले तरी वाशिम नगर परिषदेच्या ढिसाळ धोरणामुळे शहरातील अनेक भाग अद्यापही तहानलेले असून काही भागांत गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही गेल्या अनेक महिन्यांपासून श्रमिक वस्ती असलेल्या नालंदानगर भागात १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरातील सर्व भागांत मुबलक पाणीपुरवठ्यासाठी मोठी पाईपलाईन बसवण्यात आली आहे. तसेच २४ तास वीज उपलब्ध राहण्यासाठी एकबुर्जी धरणावर एक्सप्रेस फीडर बसवण्यात आला आहे. मात्र अधिकार्‍यांच्या अकार्यक्षम धोरणामुळे नालंदानगरातील अर्ध्या भागात अद्याप मोठी पाईपलाईन बसवण्यात आलेली नाही. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नागरिकांना पदरचे पैसे खर्चून पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी भीमसंग्राम संघटनेने वेळोवेळी दिलेल्या निवेदनाला नगर परिषदेकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील महिलावर्गामध्ये नगर परिषदेच्या धोरणाविषयी संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे नालंदानगर परिसरातील उर्वरित भागात मोठी पाईपलाईन त्वरित बसविण्याचे आदेश नगर परिषदेला द्यावेत. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा संघटनेला नाईलाजाने या भागातील महिलांसह आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल. तसेच या दरम्यान उद्भवणार्‍या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना भीमसंग्रामच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष माया रमेश वाठोरे यांच्यासह मनिषा चंचल वानखेडे, मनिषा रवी वानखेडे, लक्ष्मी पट्टेबहादूर, लता खंडारे, दीक्षा वैद्य, विद्या शर्मा, शिल्पा पवार, विमल वाघमारे, सुनीता वाघमारे, रेखा भिसे, सोनू वानखेडे, जयश्री खिल्लारे, संध्या इंगोले, किरण तायडे, रेखा इंगळे, वच्छला पाईकराव आदी नालंदानगरातील महिला उपस्थित होत्या

Related Posts

0 Response to " नालंदानगरात पाणीटंचाई, मुख्याधिकार्‍यांची बेपर्वाई, भीमसंग्रामने सुरू केली उपोषणाची लढाई"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article