
युवा पुरस्काराचा अवमान; भ्रष्टाचाराला मान, कसा होईल युवांचा सन्मान?
साप्ताहिक सागर आदित्य
युवा पुरस्काराचा अवमान; भ्रष्टाचाराला मान, कसा होईल युवांचा सन्मान?
जिल्हा युवा पुरस्कार निवडप्रक्रियेत भ्रष्टाचार !
चौकशी करुन दोषींवर कारवाईची डॉ. माधव हिवाळे यांची मागणी
वाशिम - जिल्हा युवा पुरस्कार निवडीसाठी नेमलेल्या समितीने नियम डावलून पुरस्कारार्थींची निवड केली असल्याचा आरोप करत या युवा पुरस्काराच्या निवडीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात दैनिक भारत संग्रामचे मुख्य संपादक तथा समाजसेवक डॉ. माधव आ. हिवाळे यांनी बुधवार, २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.
या तक्रार अर्जात जिल्हा युवा पुरस्कार निवड समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, निवडीच्या प्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा युवा पुरस्कार निवडीसाठी गठीत केलेली समिती ही शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आली नसून त्यामध्ये जिल्हा युवा पुरस्कारप्राप्त एका व्यक्तीची निवड करण्यात आली नाही. पुरस्कार देण्यात आलेल्या संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र न घेता संस्थेची निवड करण्यात आली आहे. समितीमधील सदस्यांच्या नातेवाईकाला यामध्ये सहभाग घेता येत नसून समितीतील एका सदस्याच्या मुलास जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला. याची योग्य चौकशी करण्यात यावी. जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी वाशिम यांनी आरटीआय अर्जामध्ये मागीतलेली माहिती जाणूनबुजून दिली नाही. यावरुन असे सिद्ध होते की, निवड समितीमार्फत जिल्हा युवा पुरस्कार निवडीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकाराची योग्य ती चौकशी करण्यात यावी. अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा डॉ. हिवाळे यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या लेखी तक्रार अर्जाव्दारे दिला आहे. अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री तथा आयुक्त अमरावती यांना पाठविण्यात आल्या आहेत.
0 Response to "युवा पुरस्काराचा अवमान; भ्रष्टाचाराला मान, कसा होईल युवांचा सन्मान?"
Post a Comment