प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा महोत्सव जल्लोषात साजरा करूया बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा महोत्सव जल्लोषात साजरा करूया
बुवनेश्वरी एस
जिल्हाधिकाऱ्यांनी हर घर तिरंगा अभियानासाठी घेतली बैठक
वाशिम,दि.८ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस हा राष्ट्रीय सण आहे आणि हा सण प्रत्येक भारतीय नागरिक प्रचंड उत्साहाने साजरा करतो. याच अनुषंगाने हर घर तिरंगा ही मोहीम गेली दोन वर्षे शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा आणि आपल्या घर दुकाने आणि आस्थापनांवर तिरंगा फडकवून साजरा करावे असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज दि.८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात हरघर तिरंगा या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी झालेल्या बैठकीत केले.
महाराष्ट्राने स्वातंत्र्यलढ्यात भरीव योगदान दिलेले असून देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे अनन्यसाधारण स्थान आहे. या पार्श्वभूमीवर घरोघरी तिरंगा अभियानही संपूर्ण उत्साहात व्यापक प्रमाणात आपणा सर्वांना साजरे करायचे आहे. तालुका आणि गावपातळीवर हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवायचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ध्वजाची मागणी आणि त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ध्वजाची उपलब्धता ठेवावी. त्याचसोबत सर्व ध्वजाचा सन्मान ठेवला जाईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे. सर्व नागरिकांना आपल्या घरांवर त्यासोबतच, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होत दि.१३ ते १५ या कालावधीत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावे. या अभियाना निमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत करावे, जेणेकरून या अभियानात सक्रिय सहभागी होण्याची प्रेरणा नागरिकांना मिळेल.असेही जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या.
या बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे,मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब दराडे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर व जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक घराला तिरंगा झेंडा पोहोचवण्यासाठी, अभियानाची प्रभावीपणे जाहिरात करण्यासाठी, तसेच अभियानाच्या कालावधीत आयोजित केले जाणारे कार्यक्रम यांच्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना या अभियानाला यशस्वी करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या, "हर घर तिरंगा हे देशभक्तीचे प्रतीक आहे. या अभियानातून आपण आपल्या देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करतो. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या अभियानात सहभागी होऊन देशाच्या एकतेचा संदेश देण्याचे काम करू." असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
हे अभियान ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविला जाणार असून यामध्ये यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात यावे असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
0 Response to "प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा महोत्सव जल्लोषात साजरा करूया बुवनेश्वरी एस"
Post a Comment