आपत्ती निवारण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सक्षम बनावे: शाहु भगत यांचे प्रतिपादन
साप्ताहिक सागर आदित्य
आपत्ती निवारण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सक्षम बनावे:
शाहु भगत यांचे प्रतिपादन
जिल्हा परिषदेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
वाशिम,दि.२३ जून (पीआरओ):
आपत्ती निवारण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सक्षम बनावे असे प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषदेअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना (दि.22) आपत्ती व्यवस्थापनाचे धडे (प्रशिक्षण) देण्यात आले. यावेळी शाहू भगत यांनी प्रशिक्षणामागची भूमिका मांडली. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिनकर जाधव, शिक्षणाधिकारी शिंदे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयस्वाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सातत्यपूर्ण व एकात्मिक नियोजन प्रक्रिया, व्यवस्थित रचना, सहकार्य आणि आपत्तींच्या संभाव्य धोक्याला प्रतिबंध, आपत्तीतील धोक्यांची तीव्रता कमी करणे, क्षमता सबलीकरण, पूर्वतयारी, तत्पर प्रतिसाद, आपत्ती परिणामांची तीव्रता, व्यापकता पडताळून पाहणे, स्थलांतर, मदत व बचाव कार्य, पुनर्वसन व पुनर्रचना इत्यादी आवश्यक आणि उपयुक्त उपायाची अंमलबजावणी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. आपत्ती निवारण्याची जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे प्रतिपादन ब्रिजेश कुमार यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूर व जिल्हा परिषद कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जून रोजी येथील वसंतराव नाईक सभागृह वाशिम येथे पूर, विज, आग, रस्ते अपघात, सर्पदंश विषयी आपत्ती व्यवस्थापनाचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी भगत ,ब्रिजेश कुमार यादव, जयस्वाल आदींनी प्रात्यक्षिकासह उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाला जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख आणि विविध विभागातील कर्मचारी त्या प्रमाणात उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "आपत्ती निवारण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सक्षम बनावे: शाहु भगत यांचे प्रतिपादन"
Post a Comment