महिन्याला १५०० रुपये पाहिजे? मग १५ दिवसाच्या आत अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांकडे अर्ज करा!
साप्ताहिक सागर आदित्य
महिन्याला १५०० रुपये पाहिजे?
मग १५ दिवसाच्या आत अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांकडे अर्ज करा!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : २१ ते ६० वर्ष वयाच्या महिलांना लाभ
राज्याच्या अर्थसंकल्पात २८ जून रोजी अर्थमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ची घोषणा केली अन् इकडे या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जनजागृतीही सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र महिलांनी १ ते १५ जुलै २०२४ या कालावधीत संबंधित गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना, महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, सर्वांगीण विकासाच्या हेतूने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणार असल्याचे घोषित केले. या योजनेनुसार राज्य सरकारकडून २१ ते ६० वय असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये बॅंक खात्यात जमा केले जाणार आहेत. यासाठी संबंधित महिलेचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. संबंधित महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जनजागृती सुरू केली. जिल्ह्यातील पात्र महिलांना १ ते १५ जुलै २०२४ या कालावधीत संबंधित गावच्या अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत आधार कार्ड, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखाच्या आत असल्याचा तहसिलदारांचा दाखला यांसह अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे.
..........
*...तर लाभार्थी अपात्र ठरेल*
- वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा अधिक.
- कुटुंबात कोणी आयकरदाता असल्यास.
- कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असल्यास.
..............
कोट
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेकरीता पात्र महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा ग्रामसेवक यांच्याकडे १ ते १५ जुलै दरम्यान अर्ज सादर करावे."
- वैभव वाघमारे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
0 Response to "महिन्याला १५०० रुपये पाहिजे? मग १५ दिवसाच्या आत अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांकडे अर्ज करा!"
Post a Comment