नागरिकांनो ! विजा चमकत असल्यास खबरदारी घ्या
साप्ताहिक सागर आदित्य
नागरिकांनो ! विजा चमकत असल्यास खबरदारी घ्या
विजेपासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये
याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम,जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पावसामध्ये विजेपासून स्वतःला वाचवायचे असेल तरअशा पद्धतीने घ्या काळजी! विजा चमकत असताना टाळा या गोष्टी जेव्हा जून महिन्याचा म्हणजेच मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस असतो त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट होताना आपल्याला दिसून येतो. अगदी त्याच पद्धतीने अवकाळी पावसाचे जेव्हा परिस्थिती उद्भवते त्यावेळी मात्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि प्रचंड प्रमाणात विजांचा कडकडाट होत असतो व अशाप्रसंगी बऱ्याचदा वीज पडण्याच्या घटना घडतात व यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते.
जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होत असून अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी विजा पडून जनावरे आणि माणसे देखील मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडताना दिसून येत आहेत. अशा प्रसंगी खास करून शेतकरी बंधूंनी जेव्हा आकाशात विजा कडाडत असतील तर त्यावेळी योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःला वाचवणे खूप गरजेचे असते. या अनुषंगाने या लेखात आपण आकाशात विजा चमकत असताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती जाणून घेऊ.
आकाशात विजा चमकत असतील तेव्हा अशा पद्धतीने घ्या काळजी.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर शेतात काम करत असाल व आकाशात विजा चमकायला लागल्या तर त्वरित शेतामध्ये शेड किंवा घर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आसरा घ्यावा.अशाप्रकारे सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्यानंतर पायाखाली प्लास्टिक किंवा गोणपाट, कोरडे लाकूड किंवा कोरडा पाला पाचोळा ठेवावा व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळ पायावर बसावे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याचीकाळजी घ्यावी.शेतात जर ओलसरपणा असेल तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी पटकन कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जाणे गरजेचे असते. पोहणारे किंवा मच्छीमारी करणारे व्यक्ती असतील तर त्यांनी आकाशात विजा चमकायला लागल्यावर पाण्यातून बाहेर यावे व सुरक्षित आसरा घ्यावा.जर आजूबाजूला एखादे झाड असेल तर त्या झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहणे गरजेचे आहे.बऱ्याच वेळा आपल्या शेतामध्ये उन्हापासून वाचण्यासाठी एखादे उंच झाड आपण सुरक्षित ठेवतो. जर असे एखादे उंच झाड आपल्या शेतात असेल तर त्या झाडाच्या फांदीवर तांब्याची एक तार बांधावी व तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.विजेपासून वाचण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून पक्के घर ओळखले जाते. अशावेळी पक्के घरावर शक्य असल्यास वीज वाहक यंत्रणा बसवून घ्यावी.शक्यतो घर किंवा शेतामध्ये कमी उंचीची झाडे लावावी.आकाशात विजा चमकत असताना तुम्ही जर जंगलामध्ये असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. तुम्हाला शक्य असल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी गुडघ्यात वाकून बसावे. जर तुम्ही आधीच खोलगट भागामध्ये असाल तर वरती येण्याचा प्रयत्न करू नका.एखाद्या चारचाकी वाहनातून प्रवास करीत असाल तर विजा चमकत असताना वाहनातच राहावे. वाहनाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करू नये.
विजा चमकत असताना या गोष्टी टाळाव्यात
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विजा चमकत असताना खुल्या मैदानामध्ये उभे राहणे टाळा. झाडाखाली मुळीच उभे राहू नका.विजेचा केव्हा टेलिफोनचा खांब तसेच टॉवर इत्यादी जवळ उभे राहू नका. शेत तसेच बाग, घर इत्यादी भोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते. तुम्ही दुचाकी किंवा सायकल, ट्रॅक्टर इत्यादी वाहनावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. विजा चमकत असताना अशा वाहनातून प्रवास करू नका.महत्त्वाचे म्हणजे एका वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तींमध्ये किमान 15 फुटाचे अंतर राहील अशा पद्धतीने उभे रहा.धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर टाळा.पाण्याचा नळ तसेच फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका व त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. विजेवर चालणारी यंत्रे तसेच धातूपासून बनवलेल्या वस्तू जसे की कृषी यंत्र असतील तर त्यापासून दूर राहा.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आकाशात विजा चमकत असताना चुकून देखील मोबाईलचा वापर करू नका.असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.
0 Response to "नागरिकांनो ! विजा चमकत असल्यास खबरदारी घ्या"
Post a Comment