जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
आपल्या कामाचे मूल्यमापन कोणी तरी करेल, ही अपेक्षा ठेवू नका. स्वतःला ‘अबला’ समजणे बंद करा आणि स्वतःला ‘सबला’ समजा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज येथे केले.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी, माविमचे जिल्हा समन्वयक राजेश नागपूरे, रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस पूढे म्हणाल्या की, ज्या दिवशी आपल्या कामाची दखल कुणीतरी घ्यावी याची आवश्यकता भासणार नाही, त्यादिवशी आपण स्वावलंबी झालो असे समजावे. गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला ह्या काहीच करत नाहीत असे कुणीही समजू नये. २०२४ हे निवडणुकांचे वर्ष आहे. मतदान प्रक्रियेपासून जिल्ह्यातील एकही महिला वंचित राहू नये. कमावत्या पुरुषाच्या बरोबरीने व समांतर काम गृहिणी करत असते, असेही त्यांनी सांगितले. स्वतःच्या आवडीने काम करावे व आपल्या कामाची गुणवत्ता आपणच ठरवावी, असेही त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले.
बालविवाह रोखण्यासाठी १०९८ यावर संपर्क साधा
बालविवाह थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाने मदतीसाठी १०९८ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जिल्ह्यातील महिलांनी मोठी स्वप्ने पाहावी. स्त्रियांच्या विकासासाठी अनूकुल व पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. महिलांचे विचार परिवर्तन घडवून आणले तरच आपल्याला समाजाची प्रगती साधता येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या २६ महिलांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय येथील राष्ट्रीय छात्र सेनाच्या चमूने उत्तम कलागुणांचा अविष्कार दाखवून विद्यार्थीनींनी बालविवाह प्रतिबंधक पथनाट्याद्वारे सामाजिक जनजागृती केली. तसेच बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. यावेळी वैशाली देवकर, अॅड. प्रतिभा वैरागडे, स्वाती ढोबळे यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन मोलाचे केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना लोहकपूरे व प्रांजली चिपडे तर आभार मिनाक्षी भस्मे यांनी मानले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यावेळी इश्यू संस्थेच्या वतीने बालविवाहाबाबत प्रचार व प्रसिद्धी म्हणून कापडी पिशवीचे वितरण तसेच हँडबुकचे वाटप करण्यात आले.
0 Response to "जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन "
Post a Comment