-->

उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हाधिकाऱ्यांनी केला ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ


•   उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव


•  सैनिकी कविता संग्रहाचे प्रकाशन

• महिला बचतगटांना धनादेश वाटप


वाशिम, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते आज 7 डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे, यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा सुपखेलाचे कमाडेंट कर्नल प्रविण ठाकरे,वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,कारंजा उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे व प्रा.डॉ. विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहिदांच्या स्मृतीचिन्हास श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी मान्यवरांसह सभागृहात उपस्थित असलेल्या व्यक्तींनी जागेवर उभे राहून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. 


जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी शहिद शिपाई यशवंत सरकटे यांच्या वीरपत्नी श्रीमती शांताबाई सरकटे,शहिद शिपाई दगडू लहाणे यांच्या वीरपत्नी श्रीमती पार्वतीबाई लहाणे व शहिद नायक अमोल गोरे यांच्या वीरपत्नी श्रीमती वैशाली गोरे यांचा साडीचोळी देऊन सत्कार केला. 


सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 निधी संकलन शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना नायब तहसिलदार सविता डांगे यांनी सशस्त्र सेना ध्वज प्रदान करुन निधी संकलनाची सुरुवात केली.शासनाने सन 2022 या वर्षाकरीता जिल्हयाला 48 लक्ष 53 हजार रुपये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हयातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालये तसेच विविध संघटनांच्या योगदानातून जिल्हयाने 41 लक्ष रुपये निधी संकलन करुन 85 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.


जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी यावेळी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाची घोषणा केली.देशाचे रक्षण करतांना विरगती प्राप्त झालेल्या शुरवीर सैनिक हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी तसेच युध्दात लढतांना ज्या सैनिकांना अपंगत्व आले आहे,अशा सैनिकांच्या कुटूंबियांच्या मदतीसाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलीत करण्यात येतो.जिल्हयातील नागरीकांनी भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी तन मन धनाने पुढे यावे असे आवाहन श्रीमती बुवनेश्वरी यांनी यावेळी केले. 


सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 चे उत्कृष्ट निधी संकलनाप्रित्यर्थ राज्य शासनाकडून प्राप्त झालेले स्मृतीचिन्ह जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी प्रदान केले. 


यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते दक्षता माजी सैनिक स्वयंसहाय्यता महिला बचतगट, मालेगांव,सुरक्षा माजी सैनिक स्वयंसहाय्यता महिला बचतगट, मालेगांव,जय जवान माजी सैनिक स्वयंसहाय्यता महिला बचतगट, वाशिम,हिरकणी माजी सैनिक स्वयंसहाय्यता महिला बचतगट, कारंजा व सावित्री माजी सैनिक स्वयंसहाय्यता महिला बचतगट, कारंजा आणि इयत्ता 10 वी मध्ये 94 टक्के गुण मिळाल्याबद्दल यशस्वी वाघमारे हिचा विशेष गौरव पुरस्कारांतर्गत धनादेश वाटप करण्यात आले. 


मान्यवरांच्या हस्ते सुभेदार दिपक ढोले यांच्या सैनिकी कविता या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुभेदार ढोले यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.डॉ.विजय जाधव यांनी या पुस्तकावर प्रकाश टाकला. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अभिनव बालुरे,वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा तसेच वाशिम व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुगल कोठारी व आरए महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

 

प्रारंभी कल्याण संघटक संजय देशपांडे यांनी माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.डॉ. क्षितीजा लोंढे यांनी देशभक्ती गीत सादर केले.कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, बालविकास प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस्मे,नगर पालिकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड,श्री. सोनुने,यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची,माजी सैनिकांची तसेच माजी सैनिकांचे कुटूंबिय व विविध क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.सुत्रसंचालन प्रा. गजानन वाघ यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.   

                    

0 Response to "उत्कृष्ट संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article