
मेरी मिट्टी- मेरा देश अभियान प्रभावीपणे राबवा: दिगंबर लोखंडे
साप्ताहिक सागर आदित्य
मेरी मिट्टी- मेरा देश अभियान प्रभावीपणे राबवा: दिगंबर लोखंडे
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रा.पं.मध्ये प्रत्येकी ७५ रोपांची लागवड करण्याचे निर्देश
वाशिम:दिनांक 4 ऑगस्ट
केंद्र शासनाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त मेरी मिट्टी, मेरा देश है अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. हे अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी (दि.1) गट विकास अधिकारी यांना दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या गट विकास अधिकारी यांच्या सभेत लोखंडे यांनी मेरी मिट्टी- मेरा देश या अभियानाची माहिती दिली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘वसुधा वंदन’ हा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत दिनांक ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येकी ७५ रोपांची लागवड करून अमृत वाटिका तयार केली जाणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांनी २४ जुलै रोजी सर्वच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सूचना दिली आहे.
केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले होते. त्या अनुषंगाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनी २२ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करून काही सूचना दिल्या. त्यानुसार संपूर्ण राज्यात व देशात मेरी मिट्टी, मेरा देश (मिट्टी को नमन, विरो को वंदन) हे अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत या अभियानांतर्गत ९ ते १४ ऑगस्टदरम्यान विविध प्रकारचे पाच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात 'वसुधा वंदन' उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील योग्य ठिकाण निवडून ७४ देशी वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी दिल्या.
बैठकीला मंगरुळपीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरुण मोहोड, नरेगा चे गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने, सहायक प्रकल्प संचालक सचिन गटलेवार, मानोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बालासाहेब बायस, वाशिम- कारंजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय जाधव, वाशिम पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी गजानन खुळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
0 Response to "मेरी मिट्टी- मेरा देश अभियान प्रभावीपणे राबवा: दिगंबर लोखंडे"
Post a Comment