13 ऑगस्ट रोजी सायकल तिरंगा रॅली जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी व्हावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
13 ऑगस्ट रोजी सायकल तिरंगा रॅली
जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी व्हावे
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून येत्या १३ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७ वाजता या रॅलीचा शुभारंभ होईल. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम सिव्हिल लाईन मार्गे बस स्टँड, पुसद नाका,उड्डाण पुलावरून उतरून खाली डावीकडे शेलुबाजार मार्गावर आसोला,माळेगाव,तांदळी(शेवई) कोंढाळा व पिंपरी (अवगण) येथे पोहोचेल.ही रॅली तेथून परत त्याच मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचून रॅलीचा समारोप होईल.रॅली दरम्यान काही ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहे.तसेच पोलीससुद्धा काही ठिकाणी उपस्थित राहणार आहे.
या रॅलीमध्ये १५ वर्षाच्या आतील मुले- मुली,महिला व पुरुषांना सहभाग घेता येईल.१५ वर्षाच्या आतील मुले - मुली आणि महिलांसाठी १० किलोमीटरपर्यंत माळेगावपर्यंत जाणे आणि तेथून परत जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन रॅलीचा समारोप होईल.१५ वर्षावरील मुलांसाठी तसेच नागरिकांसाठी पिंपरी (अवगण)जवळील राधा स्वामी सत्संगपर्यंत २० किलोमीटर जाणे आणि तेथून परत जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन रॅलीचा समारोप होईल.
रॅलीमध्ये सहभागी व्यक्तींसाठी चहा,पाणी आणि नाश्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.ज्यांना या रॅलीमध्ये सहभाग घ्यायचा आहे,अशा व्यक्तींनी आपली नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयातील अंतर्गत लेखा परिक्षण शाखा, दुसरा माळा,रूम नंबर २०३, शर्मा सायकल स्टोअर्स,शिवाजी चौक, वाशिम आणि बाकलीवाल विद्यालय येथील शिक्षक श्री. काळे यांचेकडे आपली नोंदणी करावी.
रॅलीसाठी नोंदणी करताना सहभागी होणाऱ्या व्यक्तीने आपले नाव,पत्ता,भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख व व्यवसायाबाबतची माहिती द्यावी. तरी या सायकल तिरंगा रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0 Response to " 13 ऑगस्ट रोजी सायकल तिरंगा रॅली जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी व्हावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन"
Post a Comment