शेतकऱ्यांनो ! गाळ शेतात टाकून उत्पादकता वाढविण्यासोबत पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन करा - जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.
साप्ताहिक सागर आदित्य/
शेतकऱ्यांनो ! गाळ शेतात टाकून उत्पादकता वाढविण्यासोबत पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन करा - जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.
· रिठद जवळील तलावांची पाहणी
बीजेएस माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरु
वाशिम - जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमी आहे. मोठे सिंचन प्रकल्प जिल्ह्यात नाही. त्यामुळे सिंचन क्षेत्र कमी आहे. जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारच्या निती आयोगाने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे. जिल्ह्यातील 10 हेक्टर क्षेत्राच्या आत असलेल्या बांध व तलावांचे खोलीकरण करुन या तलावातील गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पुढे यावे आणि पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले.
आज 4 मे रोजी जिल्हाधिकारी षन्मुगराजन यांनी रिसोड तालुक्यातील रिठदजवळील जवळपास 4 हेक्टर क्षेत्र असलेल्या मुर्डेश्वर पाझर तलाव आणि नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळील 1 हेक्टर क्षमतेच्या पाझर तलावाची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे जिल्हा परिषेच्या जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, रिठद येथे सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोरकर,पंचायत समिती सदस्य गजानन आरु, ग्रामपंचायत सदस्य उतमराव आरु, बालाजी बोरकर, गणेश आरु, जमीलखॉ पठाण, माजी सरपंच बळीराम बोरकर, ज्ञानबा बोरकर, नारायण आरू, रामेश्वर आरु व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात येत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावाच्या परिसरात असलेल्या 10 हेक्टर पर्यतच्या बांध/तलावाच्या खोलीकरणासाठी पुढे यावे. तलावातील गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकल्यास शेतीची सुपीकता वाढेल आणि पीकाची उत्पादन क्षमता वाढल्यास मदत होणार आहे. या तलाव/ बांधातील गाळ काढण्याचे येणार असल्यामुळे पाणीसाठ्यांचे पुनरुज्जीवन होण्यास देखील मदत होणार आहे. तलाव परिसरातील शेतकऱ्यांना काही महिने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होवून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल. असे षन्मुगराजन उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधतांना म्हणाले.शेतकऱ्यांनी लोकसहभागातून तलावातील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकावा. त्यामुळे पीकाची उत्पादन क्षमता निश्चितच वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिठद येथील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळील तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली असून जवळपास 30 ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतात टाकण्याचे काम करीत आहे.
0 Response to "शेतकऱ्यांनो ! गाळ शेतात टाकून उत्पादकता वाढविण्यासोबत पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन करा - जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस."
Post a Comment