जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली जलसंधारणाच्या कामाची पाहणी
साप्ताहिक सागर आदित्य/
जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली जलसंधारणाच्या कामाची पाहणी
वाशिम, दि. 15 : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 15 मार्च रोजी वाशिम तालुक्यातील काटा आणि मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन व घोगरी येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. सदर कामे जून 2022 अखेर पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर व उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत वाशिम जिल्हयात जलसंधारणाची 171 कामे मंजूर आहे. यातील सन 2018-19 मधील 87 कामे आकांक्षीत जिल्हा म्हणून मंजूर केली आहे. त्यासाठी 85 कोटी रुपये निधी मंजूर झाला. त्यापैकी 13 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सुरु आहे. तसेच इतर कामे सुध्दा प्रगतीपथावर आहे.
वाशिम तालुक्यातील काटा येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 11 लक्ष रुपये किमतीचे सिमेंट साठवण बंधाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. खोलीकरणाचे काम सुरु आहे. हे काम पुर्ण होताच पावसाळयात 4 सहस्त्र घनमिटर पाणीसाठा या बंधाऱ्यात होणार आहे. त्यामुळे परिसरातील भुगर्भातील पाणीसाठयात वाढ होऊन विहीरी व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. त्यामुळे सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. अशाच प्रकारचे आणखी दोन सिमेंट साठवण बंधारे तयार करण्यात यावे. अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथून वाहणाऱ्या अडाण नदीवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या व्दारयुक्त सिमेंट साठवण बंधाऱ्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या साठवण बंधाऱ्याचे काम 90 टक्के पुर्ण झाले आहे. खोलीकरणाचे काम त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना यावेळी दिले. खोलीकरणाचे काम पुर्ण झाल्यावर उपलब्ध पाणी साठयातून परिसरातील 45 हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. नदीमध्ये जवळपास दीड किलोमिटर अंतरापर्यंत बंधाऱ्यापासून पाणीसाठा राहणार आहे. जवळपास 70 सहस्त्र घनमिटर पाणीसाठा या नदीवरील बंधाऱ्यात उपलब्ध असणार आहे.
शेलूबाजार जवळील घोगरी येथे अडाण नदीच्या काठावर जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सुरु असलेल्या पुर संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी यावेळी श्षण्मुगराजन यांनी केली. या कामावर 11 लक्ष रुपये खर्च होणार असून 50 टक्के काम पुर्ण झाले आहे.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबादअंतर्गत आकांक्षीत जिल्हा म्हणून वाशिम जिल्हयात सन 2018-19 मध्ये 87 कामे मंजूर होती. त्यासाठी 85 कोटी रुपये निधी मंजूर झाला. परंतू कोरोनामुळे ही कामे सुरु होण्यास विलंब झाला. त्यातील 13 कामे पुर्ण झाली आहे. उर्वरित कामे सुरु आहे. सन 2018-19 या वर्षात सर्वसाधारण नियोजनातील 42 कोटीची 47 व्दारयुक्त सिमेंट बंधाऱ्याची कामे मंजूर आहे. त्यापैकी 23 कामे पुर्ण झाली आहे. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. सन 2020-21 या वर्षात रिसोड आणि मालेगांव तालुक्यासाठी 42 कोटीची 37 कामे मंजूर झाली असून ही कामे लवकरच सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी आकोसकर यांनी दिली.
0 Response to "जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली जलसंधारणाच्या कामाची पाहणी"
Post a Comment