वाशिम येथे तूझं गावच नाही का तीर्थ? कार्यशाळेचे उद्घाटन!
साप्ताहिक सागर आदित्य/
स्वच्छतेच्या क्षेत्रात प्रभावी पर्याय दिल्यास लोकं बदलतात: भास्कर पेरे
पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी दिले निगराणी समितीला प्रशिक्षण
स्वच्छतेच्या क्षेत्रात लोकांच्या सवयीत सकारात्मक बदल करण्यासाठी त्यांना तितकाच प्रभावी पर्याय देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आदर्श ग्राम पाटोदा (जि.औरंगाबाद) चे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी केले.
वाशिम जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशनच्या वतीने नियोजन भवन येथे आयोजित ग्राम स्वच्छता निगरानी समिती सदस्यांच्या प्रशिक्षणादरम्यान (दि.१०) ते बोलत होते. जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन केले. स्वच्छतादूत राजु सरतापे, सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने यांंची यावेळी उपस्थिती होती.
स्वच्छ भारत अभियानामध्ये लोकसहभाग वाढवीण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतीमध्ये ग्राम स्वच्छता निगरानी समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान या समितीमध्ये समाविष्ट असलेल्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन १० ते १२ मार्च दरम्यान करण्यात आले. गावातील शाश्वत स्वच्छतेबाबत या कार्यशाळेत विचारमंथन करण्यात आले. मंगरुळपीर व वाशिम या दोन तालुक्यातील प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेच्या प्रथम सत्रात पाटोदा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी ग्राम स्वच्छता आणि शाश्वत ग्राम विकास या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपण्या विनोदि शैलीतुन आणि अत्यंत परखड शब्दात गावात सुधारणा करण्याच्या टिप्स दिल्या...
वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात स्वच्छतेविषयी तुझं गावच नाही का तीर्थ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गावा गावात ग्राम स्वच्छता निगरानी समितीची निर्मीती केली असुन गावातील सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, आशा, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक, ग्राम पंचायत कर्मचारी, स्वच्छाग्रही यांचा या समीतीमध्ये समावेश आहे. या समिती सदस्यांना गावातील स्वच्छता शाश्वत रहावी म्हणून शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गुड मॉर्निंग पथक, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन इ. बाबत प्रशिक्षण देण्यात आले.
काय करु नका ऐवजी काय करायचे हे सांगायला पाहिजे!
उघड्यावर हागायला जाऊ नका, इथे थुंकु नका, तिथे कचरा टाकु नका असे सांगतो, पण लोकांनी काय केलं पायजे हे प्रभावीपणे सांगितले जात नाही. लोकांना पटण्याजोगा पर्याय दिल्यास लोकं बदलतात अशी खात्री भास्कर पेरे यांनी दिली. आम्ही लोकांना नुसतं थुंकु नका असं नं सांगता गावात जागोजागी वाॅश बेसिन बसवुन त्यामध्ये नळ लावुन त्याच्यात थुंका असा पर्याय दिला असं ते म्हणाले.
निगरानी समितीच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन:
कार्यक्रमात ग्राम स्वच्छता निगरानी समितीच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत आणि भास्कर पेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी केले. संचालन जल जीवन मिशनचे मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी संचालन व पिंपळखुटा ग्रा. पं. चे सरपंच सुदर्शन धोटे यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Response to "वाशिम येथे तूझं गावच नाही का तीर्थ? कार्यशाळेचे उद्घाटन!"
Post a Comment