नवसाला पावणारे मालेगावचे ५५ वर्ष जुने श्री संतोषी माता देवस्थान
वाशिम - नवरात्रामध्ये नऊ दिवस भाविक भक्त देवीला नवस करुन मनोकामना मागतात. हे नऊ दिवस विविध देवस्थाने भक्तीने ओसंडून वाहत असतात. जिल्ह्यात अनेक प्रसिध्द देवस्थाने आहेत. जेथे नवरात्रीच्या नऊ दिवसाव्यतीरिक्त नेहमी भाविकांची गर्दी असते. जिल्हयातील मालेगाव येथील शेलु फाट्यावरील संतोषीमाता नगरात असलेेले श्री संतोषीमाता देवस्थानाचे पंचक्रोशित आगळेवेगळे भक्तीमय स्थान आहे. ५५ वर्ष जुने असलेले हे देवस्थान नोंदणीकृत असून येथील देवीची भक्ती करुन मनोभावे मनोकामना मागीतल्यास देवी नक्कीच नवसाला पावते अशी या देवीची महिमा आहे. येथे वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. येथे संतोषीमाता बरोबरच दुर्गा माता, गजानन बाबा, साईबाबा यांचे सुद्धा मंदिर आहेत, नवरात्रात मंदिरावर दर्शनासाठी भाविकांची दरवर्षीप्रमाणे यंदाही रीघ लागत आहे. संतोषी माता संस्थान परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्यातीप्राप्त आहे.
देवस्थान मंडळाच्या वतीने येथे वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमामध्ये परिसरातील भाविक भक्त उत्साहात भाग घेतात. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तेजस मिश्रा यांच्या हस्ते संतोषी माता व दुर्गा मातेच्या मूर्तीची पूजाअर्चा करून घटस्थापना करण्यात आली. या देवीची धार्मिक पुजाअर्चना मिश्रा परिवारातील सर्व सदस्य आनंदाने व भक्तीमय वातावरणात पार पाडतात. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या श्री संतोषीमाता देवीच्या दर्शनाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तेजस मिश्रा यांनी केले आहे.
0 Response to "नवसाला पावणारे मालेगावचे ५५ वर्ष जुने श्री संतोषी माता देवस्थान"
Post a Comment