-->

पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा

पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

💧 पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा


— जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


📌 संभाव्य पाणीटंचाई उपाययोजना आढावा सभा


📍 वाशिम,  : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आतापासूनच काटेकोरपणे करावे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.


🏢 जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा व्हीसी दालनात आयोजित संभाव्य पाणीटंचाई उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.


👥 बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कानेरकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरेंद्र वाघमारे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, वाशिम नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


💧 जिल्हाधिकारी कुंभेजकर बोलतांना म्हणाले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रत्येक गावाचा स्वतंत्र आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत कायम राहील, यासाठी आवश्यक नियोजन करावे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या पंचायत समितीनिहाय तातडीने आढावा बैठका घ्याव्यात. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या मुख्य व वितरण पाईपलाईनची दर १० दिवसांनी तपासणी करून गळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.


📢 पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर व्यापक जनजागृती करावी. प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धीपत्रके जारी करण्यासोबतच जलदूत, प्रशासक, सरपंच व माजी सरपंच यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


⚡ जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांमधून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे पाणी उपसा रोखण्यासाठी महावितरणने सजग राहावे. एकबुर्जी प्रकल्पातील अवैध सिंचन पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष लक्ष देऊन तेथील बेकायदेशीर वीज जोडण्या तात्काळ खंडित कराव्यात, असे निर्देशही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.


🚨 धरणे व तलावांवर अचानक रात्रपाळी पाहणी करण्यासाठी नगर परिषद, महावितरण, पाटबंधारे, लघु पाटबंधारे तसेच मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त गस्ती पथके स्थापन करुन संबंधित विभागांनी आपल्या प्रतिनिधींची नावे व मोबाईल क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करावेत. पाहणीचे छायाचित्रे व अहवाल शेअर करण्यासाठी विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले.


🚰 जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील अपूर्ण कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी उपअभियंत्यांनी प्रत्यक्ष पाठपुरावा करावा. सर्व संबंधित विभागांनी बैठकीत दिलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करून तात्काळ अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.


#पाणीटंचाई #पाणीपुरवठा #पाणीयोजन #जलजीवनमिशन #पाणीसाठा #पाण्याचीकाटकसर #एकबुर्जीप्रकल्प #वाशिम #जिल्हाधिकारी #योगेशकुंभेजकर #जिल्हामाहितीकार्यालयवाशिम

0 Response to "पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article