आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय, आमखेडा
तसेच आयुष ग्राम आयुर्वेदिक दवाखाना, आमखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. माणिकराव बाबाराव जोगदंड हे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी योगाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. “निरोगी शरीरातच निरोगी मन वसते, आणि त्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे,” असे सांगत त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले. तसेच तणावमुक्त जीवन, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योगाची आवश्यकता त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केली.
या प्रसंगी उपस्थितांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा केला. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, पवनमुक्तासन तसेच अनुलोम-विलोम, कपालभाती यांसारख्या प्राणायामांचे सादरीकरण करण्यात आले. सहभागींच्या उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमात कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच आमखेडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये योगाविषयी जागरूकता वाढून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश पोहोचला.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते. शेवटी सर्वांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
0 Response to "आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा"
Post a Comment