एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा
साप्ताहिक सागर आदित्य
एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•भूजल पातळी वाढविण्यासाठी कामे करण्याचे निर्देश
मुंबई, दि. ८ : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मृद व जलसंधारण विभागाचा आढावा घेतला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे जल -विषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, मृद व जलसंधारण आयुक्त अंजली रमेश, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारण, जलयुक्त शिवारमधील कामांचे प्राधान्य ठरवून ती पूर्ण करण्यात यावीत. तसेच जलयुक्त शिवार २.० अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तींच्या कामांची निकड पाहून ही कामे आराखड्यात समाविष्ट करून तातडीने पूर्ण करावीत. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे १५ मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत. तसेच जिल्ह्यांना सुधारित आराखडे देऊन कामांना गती द्यावी. जलयुक्त शिवारची कामे हाती घेतलेल्या गावांबाहेरील १० टक्के कामेही प्राधान्यक्रम ठरवून हाती घेण्यात यावीत.
केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामाअंतर्गत नालाखोलीकरणची कामे करताना त्याठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये, यासाठी नाल्याच्या ठिकाणी बांबू लागवड करण्याचा विचार करावा. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे जून महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करावे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत वाढीव निधी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री यांना स्वतः भेटणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले की, मृद व जलसंधारण विभागाच्या आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्याने आता कामास गती येईल. आतापर्यंत मंजुरी दिलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच मूळ आराखड्यानुसारच कामे पूर्ण व्हावीत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. मालगुजारी तलावांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे काढण्याची परवानगी मिळावी.
सचिव पापळकर यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विशेष निधी व अभिसरणअंतर्गत आतापर्यंत गाव आराखड्याप्रमाणे १ लाख ४४ हजार ६९७ कामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी १ लाख १० हजार १२० कामे पूर्ण झाली आहेत. ऊर्वरित कामे प्रगतीपथावर असून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर टँकरग्रस्त आणि भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये प्राधान्याने कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच विविध योजनाअंतर्गत पाणलोट क्षेत्रात झालेल्या मृद व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत १५ लाख १५ हजार कामांपैकी १२ लाख २७ हजार संरचनांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी झाली आहे.गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत यावर्षी १४३५ जलसाठ्यातून ४७७.७३ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे ३०८३५ सघमी पाणीसाठा पुनर्स्थापित झाला असून ७३ हजार ४१७ एकर क्षेत्र सुपिक झाले आहे. या वर्षी १५ जून पर्यंत जिल्हानिहाय गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत आतापर्यंत २२ हजार कामे पूर्ण झाली असून त्यांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. तसेच पाणलोट विकास घटकांतर्गत ५७ अमृत सरोवर तयार करण्यात येत असून १५ जूनपर्यंत ३१ अमृत सरोवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विभागाच्या पाच वर्षाच्या बृहद आराखड्याअंतर्गत राज्यातील २७ हजार ९४२ सूक्ष्म पाणलोटांमध्ये १ लाख २१ हजार ५८३ कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
००००
नंदकुमारवाघमारे/विसंअ
वृत्त 1629
इंडियन ऑइलच्या सीएसआर उपक्रमातून सर जे. जे. रुग्णालयाला मिळणार
अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून श्वसनविकारांच्या निदानाला मिळणार गती
मुंबई, दि. 8 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुंबईतील सर जे.जे.हॉस्पीटी येथे अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सर जे. जे. रुग्णालयातील फुफ्फुसविकार विभागामध्ये दरमहा सुमारे ७० ते ८० ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया केल्या जातात. क्षयरोग, विशेषतः औषध-प्रतिरोधक क्षयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि श्वसनमार्गातील अडथळे यांसारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान करण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, जुन्या आणि कालबाह्य उपकरणांमुळे वेळेवर आणि अचूक निदान करण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर इंडियन ऑइलने सीएसआरच्या माध्यमातून हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून दिली असून त्यामुळे रुग्णालयाच्या निदान क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे श्वसनविकारांचे अचूक आणि जलद निदान शक्य होईल, तसेच गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्यास मदत मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, राज्य शासनाच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांना विविध उद्योगसमूह आणि सार्वजनिक उपक्रमांचे सहकार्य लाभत आहे. इंडियन ऑइलच्या या उपक्रमामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सरकारी रुग्णालयातच उपलब्ध होतील. लवकर निदान आणि वेळेत उपचार यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होईल.
या नव्या प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या तपासण्यांसाठी जाण्याची गरज कमी होणार असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे. श्वसनविकारांच्या उपचारामध्ये ही सुविधा महत्त्वाची ठरणार असून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी सीएसआर भागीदारीचे हे एक प्रभावी उदाहरण मानले जात आहे.
दत्तात्रय कोकरे/विसंअ
0 Response to "एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा"
Post a Comment