-->

अल्पसंख्याक युवकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

अल्पसंख्याक युवकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी



 साप्ताहिक सागर आदित्य 

अल्पसंख्याक युवकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करावे


जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश


जिल्हास्तरीय समिती सभा


वाशिम,   अल्पसंख्याक युवकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या आढावा सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रविण खंडारे, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन नखाते, योजना उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, वाशिम मुख्याधिकारी निलेश गायकवाड, रिसोड मुख्याधिकारी सतीश शेवदा, कारंजा मुख्याधिकारी महेंद्र वाघमोडे आदी उपस्थित होते.


सभेत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, क्रीडा सुविधा तसेच नागरी सुविधा याबाबत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.


शिक्षण विभागाच्या आढाव्यात पाचवी ते सातवीतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शाळाबाह्य होण्याची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गळतीमागील कारणांचा अभ्यास करून पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच उर्दू माध्यम शाळांमधील गणित व विज्ञान विषय शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबतही चर्चा झाली. मराठी भाषा फाउंडेशन योजनेअंतर्गत उर्दू माध्यमाच्या दोन शाळांमध्ये मराठी विषय शिकविण्यासाठी तीन मानसेवी शिक्षक कार्यरत असून ४७४ विद्यार्थी लाभ घेत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

क्रीडा विभागाच्या आढाव्यात जिल्हा क्रीडा निधीतील २० टक्के निधी अल्पसंख्याक शाळांसाठी राखीव ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग वाढविण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

शासकीय तंत्रनिकेतनातील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाच्या दुरुस्ती कामाचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वसतिगृह पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत निर्देश देण्यात आले.

अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये नागरी सुविधा, स्वच्छता, आरोग्य सेवा व पाणीपुरवठा यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या कामांची यादी तयार करून सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या आढाव्यात अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यावर भर देण्यात आला. तसेच मागील बैठकीतील प्रलंबित अनुपालन अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

महिला व बालविकास विभागाला अल्पसंख्याक महिला व बालकांपर्यंत विविध योजना प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले. अल्पसंख्याक महिलांना कायदेशीर सल्ला व बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यास सांगण्यात आले.

आरोग्य विभागाच्या आढाव्यात अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच आशा सेविकांच्या सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी जात वैधता प्रमाणपत्रांबाबतही आढावा घेण्यात आला. अल्पसंख्याक समुदायाच्या जात वैधता प्रमाणपत्रांसाठी २१ नोव्हेंबर २०१६ ते १३ मे २०२६ अखेर ३१३४ प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी २८५१ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाने दिली. 

एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत आरोग्य विभागाकडून माहिती घेतली. पात्र मुलींना वेळेत लसीकरण मिळावे यासाठी शाळा, अंगणवाडी व आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण तसेच शहरी भागात जनजागृती वाढवून पालकांमध्ये लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0 Response to "अल्पसंख्याक युवकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article