पोहरादेवीचा १ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच होणार कार्यान्वित वीज खर्च शून्यावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
साप्ताहिक सागर आदित्य
पोहरादेवीचा १ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प
लवकरच होणार कार्यान्वित
वीज खर्च शून्यावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची पाहणी
वाशिम, दि. ३० मे बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी उभारण्यात आलेला १ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प हा हरित ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असून या प्रकल्पामुळे नंगारा भवन व परिसराचा वीज खर्च जवळपास शून्यावर येणार आहे. तसेच अतिरिक्त वीज विक्रीतून उत्पन्न मिळून विकासकामांना गती मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पाहणी दरम्यान केले.
जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी आज मौजे गिरोली, ता. मानोरा येथे उभारण्यात आलेल्या १ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाच्या कार्यकारी अभियंता निता बोकाडे यांनी सदर प्रकल्पाचे सादरीकरण केले. तसेच मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील थोटांगे, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, सार्वजनिक बांधकाम (विद्युत) उप-विभागचे सहायक अभियंता स्वरूप सरोदे तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
श्री संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत या प्रकल्पासाठी दि. २४ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार ७ कोटी रुपयांच्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्रकल्पासाठी मौजे गिरोली येथील गट क्रमांक ३१३ मधील २ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभाग, यवतमाळ यांच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी पूर्ण करण्यात आली असून प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. सध्या ओपन ऍक्सेस मंजुरीसाठी महावितरणच्या मुख्य अभियंता (वाणिज्य) कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे १५ लाख किलोवॅट युनिट वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे. त्यापैकी पोहरादेवी येथील नंगारा भवन व परिसरासाठी अंदाजे १२ लाख किलोवॅट युनिट वीज वापरली जाणार आहे. त्यामुळे परिसराचे वीज देयक मोठ्या प्रमाणात कमी होऊन जवळपास शून्यावर आणणे शक्य होणार आहे.
उर्वरित सुमारे ३ लाख किलोवॅट युनिट वीज महावितरणला विक्री करण्यात येणार असून त्यातून मिळणारे उत्पन्न प्रकल्पाची देखभाल, व्यवस्थापन तसेच भविष्यातील विकासकामांसाठी उपयोगात आणले जाणार आहे.
सौर ऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि अपारंपरिक ऊर्जा असल्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्यास या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे. परिणामी पर्यावरण संवर्धनाबरोबरच हरित ऊर्जेच्या वापरालाही चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे पोहरादेवी हे केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र न राहता ‘इको-टुरिझम’ आणि ‘आदर्श शाश्वत तीर्थक्षेत्र’ म्हणून राज्यात नवी ओळख निर्माण करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी व्यक्त केला.
0 Response to "पोहरादेवीचा १ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच होणार कार्यान्वित वीज खर्च शून्यावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल"
Post a Comment