एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
वाशिम,
भारतीय हवामान विभागाने चालू वर्षामध्ये ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि त्याचे वितरण अनियमित होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, खरीप हंगामात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचा फटका शेतीला बसू नये, म्हणून शेतकऱ्यांनी आतापासूनच शेती व्यवस्थापनात आवश्यक बदल करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी शेतकऱ्यांना योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
संभाव्य एल निनो परिस्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी खालीलप्रमाणे महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे:
१. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड व टप्प्याटप्प्याने पेरणी
कमी आणि अनिश्चित पावसाच्या काळात जास्त पाणी लागणारी आणि दीर्घ कालावधीची पिके घेणे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा प्रकार आणि उपलब्ध पाण्याचा विचार करून सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसारख्या कमी कालावधीत येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. तसेच, कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या दुष्काळ सहनशील सुधारित वाणांचाच वापर करावा. हवामान विभागाच्या अंदाजाचा नियमित अभ्यास करून आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता असल्यास टप्प्याटप्प्याने पेरणी करावी.
२. सूक्ष्म सिंचन आणि जलसंधारणावर भर
उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून पिकांच्या मुळांपर्यंत आवश्यक तेवढेच पाणी पोहोचवता येईल. याशिवाय, पाणी अडवा, पाणी जिरवा अंतर्गत शेततळे, सिंचन तलाव व जलसाठवण टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवावे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी व मातीची धूप रोखण्यासाठी समतल बांध, चर, कंपार्टमेंट बंडिंग यांसारखी मृद व जलसंधारणाची कामे प्राधान्याने करावीत.
३. आच्छादन (मल्चिंग) आणि सेंद्रिय खतांचा वापर
जमिनीतील बाष्पीभवन कमी करून ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, सेंद्रिय पदार्थ किंवा प्लास्टिक मल्चिंगचा वापर करावा. यामुळे तणांचे प्रमाणही नियंत्रित राहते. तसेच शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा, ज्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.
४. पीक विमा आणि चारा नियोजन
हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'मध्ये आवर्जून सहभागी व्हावे. यासोबतच, पशुपालकांनी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जनावरांसाठी हिरवा व सुका चारा आणि पिण्याच्या पाण्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी. सिंचनाचे योग्य वेळापत्रक आखून पाण्याचा सामूहिक व काळजीपूर्वक वापर करावा.
हवामान बदलाच्या या काळात शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. अधिक माहिती व तांत्रिक मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
0 Response to "एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन"
Post a Comment