किन्हीराजा दत्तक गाव सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल
साप्ताहिक सागर आदित्य
किन्हीराजा दत्तक गाव सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
मनरेगाच्या बळावर किन्हीराजा दत्तक गावाचा सर्वांगीण विकास वेगात
जलसंधारण, कृषी, पर्यटन व महिला सक्षमीकरणाला नवी चालना
वाशिम, (जिमाका) किन्हीराजा या दत्तक गावात सर्व विभागांनी समन्वयाने काम करत विकासाची गती वाढवावी. जलसंधारण, कृषी, रोजगारनिर्मिती, पर्यटन आणि महिला सक्षमीकरण या सर्व घटकांचा समतोल साधत गावाचा सर्वांगीण विकास साधला तर हे गाव जिल्ह्यासाठी आदर्श मॉडेल ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
यावेळी उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, रोहयो उपजिल्हाधिकारी संजय नागटिळक,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, मनरेगा जिल्हा समन्वयक निलेश घुगे यांच्यासह विविध यंत्रणा प्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दत्तक गाव म्हणून निवडलेल्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे विविध विभागांच्या समन्वयातून सर्वांगीण विकासाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जलसंधारण, कृषी, पशुसंवर्धन, पर्यटन, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत ठोस कामांना गती मिळत आहे.
१२ जानेवारी २०२६ नंतर गावात विकासकामांचा वेग वाढविण्यात आला आहे. एचडीएफसी बॅंकेच्या सीएसआर मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी पाच लक्ष सीएसआर निधीची मागणी केली आहे.
इतर विभागामार्फत आवश्यक प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर काही कामे लगेच सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सेट्रीस या संस्थेच्या माध्यमातून वृक्षलागवड व बांबू लागवडीसाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे. तसेच नव्या जॉब कार्डची नोंदणी, सक्रिय मजुरांचे ई-केवायसी पूर्ण करून मनरेगाअंतर्गत विविध कामांचे लोकेशन ‘युक्तधारा’ पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे.
जलसंधारण व पायाभूत सुविधा विकासाला गती
गावातील मोठा व छोटा तलाव, तसेच सुमारे १४०० मीटर नालाखोलीकरण कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी तलावांची सध्यस्थिती, पाणीसाठा क्षमता व दुरुस्तीची आवश्यकता यांचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर केले आहेत. ‘नाम फाउंडेशन’च्या सहकार्याने हनुमान मंदिर तलाव, कमलेश्वर मंदिर तलाव आदी ठिकाणी जलसंधारण व मृदसंधारण कामांची पाहणी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे.
कृषी क्षेत्रात शाश्वततेकडे वाटचाल
कृषी विभागामार्फत शेततळ्यांसाठी व्यवहार्यता तपासणी, इच्छुक शेतकऱ्यांशी चर्चा, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, कृषी यांत्रिकीकरण याबाबत मार्गदर्शन सुरू आहे. विविध कृषी योजनांची माहिती, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व शेतकरी मेळावे आयोजित केले जात आहेत. फळबाग लागवडीसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजनही प्रस्तावित आहे.
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाला चालना
पशुसंवर्धन विभागाकडून ‘पशु संजीवनी’ शिबिराचे आयोजन करून जनावरांवर उपचार व जंतनाशक औषधांचे वितरण करण्यात आले. १०० टक्के लसीकरण मोहिम, दुग्ध उत्पादन वाढीसाठी जनजागृती, तसेच मांस उत्पादन वाढीसाठी उपाययोजना आणि वंध्यत्व निवारण शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन आहे. विदर्भ- मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रकल्पाशी जोडण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
पर्यटन विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा
वन विभागाच्या माध्यमातून कारेपूर्णा अभयारण्य परिसरात पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. पांडवलेणी टेकडी विकास, महादेव कुंड परिसरात सीएनबी कामे, वाहनतळ, तसेच झिपलाईन अॅडव्हेंचर यांसारख्या उपक्रमांची आखणी सुरू आहे. समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महिला सक्षमीकरण व रोजगारनिर्मितीला प्राधान्य
महिला व बालकल्याण विभाग आणि उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना विविध उद्योग प्रशिक्षण देण्यात येत असून पापड, मसाला, शिवणकाम, ब्युटी पार्लर, किराणा व्यवसाय यांसारख्या उपक्रमांना चालना दिली जात आहे. उत्पादन गट व ग्रामसंघ स्थापन करून महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फतही सहकार्य दिले जात आहे.
इतर विभागांचीही सक्रिय भूमिका
क्रीडा विभागाकडून ओपन जिम, बंदिस्त व्यायामशाळा व रनिंग ट्रॅकसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. कामगार विभागाने बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. समाजकल्याण विभागाकडून दलित वस्ती विकास, स्मशानभूमी सुशोभीकरण व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी वस्तींसाठी मूलभूत सुविधा, संरक्षण किट व विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
शिक्षण, मत्स्यव्यवसाय व इतर योजनांनाही चालना
शिक्षण विभागाकडून शाळा विकास आराखडे, गुणवत्ता वृद्धी व विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. मत्स्यव्यवसाय विभागाला गावात मत्स्य व्यवसाय वृद्धीसाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बांधकाम व पंचायत विभागांमार्फत मनरेगाअंतर्गत अधिकाधिक कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांना देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू असून काही कामांचे अहवाल प्रलंबित असले तरी किन्हीराजा गावाचा विकास आराखडा वेगाने आकार घेत आहे. सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून हे दत्तक गाव लवकरच आदर्श विकास मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0 Response to " किन्हीराजा दत्तक गाव सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल"
Post a Comment