आज राष्ट्रीय पंचायत राज दिन: ग्रामपंचायतींमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
आज राष्ट्रीय पंचायत राज दिन:
ग्रामपंचायतींमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे आवाहन
राज्य शासनाच्या निर्देशानुसार 24 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय पंचायत राज दिन (NPRD) 2026 निमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी सर्व ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांनी पंचायत विभागामार्फत सर्व गटविकास अधिकारी यांना याबाबत निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर या दिवशी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून पंचायत राज व्यवस्थेचे बळकटीकरण, महिला नेतृत्वाखालील विकास, पंचायतांच्या उत्पन्नवाढीचे धोरण, तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे (LSDGs) याविषयी जनजागृती करण्यात यावी.
तसेच जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. कार्यक्रमामध्ये महिला सहभाग, स्थानिक विकास उपक्रम आणि पंचायत प्रशासनातील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून आवश्यक सहकार्य करावे, तसेच कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि अहवाल पंचायत राज कार्यालयाकडे वेळेत सादर करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. सर्व ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पंचायत राज व्यवस्थेला अधिक सक्षम बनविण्याचे आवाहन केले आहे.
0 Response to "आज राष्ट्रीय पंचायत राज दिन: ग्रामपंचायतींमध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे आवाहन"
Post a Comment