नालंदा नगर येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न.
साप्ताहिक सागर आदित्य
नालंदा नगर येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न.
नालंदा नगर, येथे महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दि. ११ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सहदेव चंद्रशेखर, उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, एकनाथ धवसे, ॲड. नारायण पडघान, संजय पडघान व समितीचे इतर पदाधिकारी यांच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
महोत्सव मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
यावर्षीच्या जयंती महोत्सवाची विशेष बाब म्हणजे प्रगल्भ विचारसरणी असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली उत्सव समिती गठीत करण्यात आली होती. महोत्सवासाठी लागणारा संपूर्ण खर्च नगरातील समाजबांधवांकडून धम्मदानाच्या स्वरूपात पारदर्शक पद्धतीने जमा करण्यात आला. तसेच वर्गणीची दैनंदिनी वेळोवेळी अद्ययावत करून समाजासमोर सादर करण्यात आली. कार्यक्रमात कोणत्याही व्यक्तीचा सत्कार करण्याऐवजी, “बाबासाहेबांपेक्षा कोणीही मोठे नाही” या भूमिकेचा आदर्श ठेवण्यात आला.
दि. ११ एप्रिल रोजी त्रिरत्न बुद्ध विहारातील प्रांगणात समितीचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भन्ते प्रज्ञापाल महाथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने महोत्सवाची सुरुवात झाली. यानंतर राम शृंगारे व अनिल इंगोले यांनी महात्मा फुले यांचे अखंडाचे वाचन केले. दुपारी आरती ठोके यांच्या नेतृत्वात महिलांसाठी "सोहळा भीम कन्येचा उत्सव नालंदा नगरचा" आयोजित करण्यात आला. संध्याकाळी स्वर सागर कलासंचच्या वतीने भीमगीत गायन ‘भीम ज्ञानाचा पॉवर’ कार्यक्रम सादर झाला.
दि. १२ एप्रिल रोजी इंडियन आयडॉल फेम चेतन उचितकर यांच्या ‘चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा’तर्फे दिव्यांग मुलांचा प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
दि. १३ एप्रिल रोजी बौद्ध धम्मावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली तसेच लहान मुला-मुलींसाठी भीमगीतावर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली.
दि. १४ एप्रिल रोजी त्रिरत्न बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजारोहण करून भव्य धम्म रॅलीला सुरुवात करण्यात आली. महिलांच्या लेझीम पथकाने रॅलीत विशेष आकर्षण निर्माण केले. ही रॅली सर्वात मोठी व विक्रमी ठरली. नालंदा नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. परंपरेनुसार महोत्सव समितीचे अध्यक्ष सहदेव उत्तमराव चंद्रशेखर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचशील व त्रिशरण ग्रहण करत मिरवणूक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
------------
महोत्सवादरम्यान पाण्याची व्यवस्था प्रमोद खिल्लारे व आनंद रणबावळे यांनी केली, तर लाईनची व्यवस्था त्रिरत्न बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट व राम खिल्लारे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महोत्सव समितीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, एकनाथ धवसे, ॲड. नारायण पडघान, संजय पडघान, संजय वानखडे, डॉ मुरलीधर ताजणे, भगवान ठोके, तलाठी राजू भुसारी, मेजर प्रल्हाद सरकटे यांच्यासह आरतीताई ठोके, मंदाताई हनुमंते, ईरावती अंभोरे, सुनिता कांबळे व सिद्धांत चंद्रशेखर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच रॅली शिस्तबद्ध व निर्विघ्न पार पडावी यासाठी समाजसेवक संतोष ठोके व नगरपरिषद वाशिमचे स्थायी समिती प्रमुख अनिल ताजने यांनी विशेष दक्षता घेतली.
या चार दिवसीय महोत्सवाने समाजात एकात्मता, समता व बौद्धिक जागृतीचा संदेश देत नालंदा नगराची जयंती कार्यक्रम रॅली ही जिल्ह्यासाठी एक आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.
0 Response to " नालंदा नगर येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न."
Post a Comment