‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना’ महिला उद्योजिकांच्या यशाची नवी कहाणी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
साप्ताहिक सागर आदित्य
‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना’
महिला उद्योजिकांच्या यशाची नवी कहाणी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
ग्रामीण भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणारी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही योजना महिला उद्योजिकांसाठी परिवर्तनाची नवी दिशा ठरत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असून, त्यांच्या हाताला उद्योगाची ताकद मिळत आहे.
या योजनेअंतर्गत “वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट” संकल्पनेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योगांना नवसंजीवनी मिळत असून महिलांच्या सहभागात लक्षणीय वाढ होत आहे.
विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये महिला उद्योजिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. सन २०२३-२४ मध्ये ७५ महिला उद्योजिकांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यानंतर सन २०२४-२५ मध्ये हा आकडा झपाट्याने वाढून १३८ महिला उद्योजिका लाभार्थी ठरल्या. तर चालू सन २०२५-२६ मध्ये आतापर्यंत ५३ महिला उद्योजिकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. ही वाढती आकडेवारी महिलांच्या उद्योजकतेकडे वाढत्या कलाचे स्पष्ट द्योतक आहे.
योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान, तसेच प्रशिक्षण, पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी सहाय्य दिले जाते. त्यामुळे महिलांना उद्योग उभारणीपासून ते बाजारपेठेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळते.
मसाले प्रक्रिया, लोणचे, पापड, दुग्धजन्य पदार्थ, फळ-भाजीपाला प्रक्रिया अशा विविध व्यवसायांमध्ये महिला उद्योजिका यशस्वी होत असून, त्या स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
एकूणच, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही योजना महिला सक्षमीकरणाचा मजबूत पाया ठरत असून, ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला गती देणारी प्रभावी योजना म्हणून उदयास येत आहे.
#NariShaktiVandan #नारीशक्तीवंदन #महिला_सक्षमीकरण #WomenEmpowerment #समाज_विकास
0 Response to "‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना’ महिला उद्योजिकांच्या यशाची नवी कहाणी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ"
Post a Comment