जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा इशारा उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा इशारा
उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
जिल्ह्यात मागील २ ते ३ दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती भारतीय मौसम विज्ञान केंद्र, नागपूर यांनी दिली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ‘काय करावे व काय करू नये’ याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी खालील उपायांचे काटेकोर पालन करावे:
दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक असून तहान नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. बाहेर जाताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा पांढरा शेला/दुपट्टा वापरावा.
घरात सूर्यप्रकाश येऊ नये यासाठी पडदे व झडपा लावाव्यात. हलक्या, पातळ व सच्छिद्र सूती कपड्यांचा, विशेषतः पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. प्रवास करताना व कामाच्या ठिकाणी पुरेसे थंड पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी यांसारख्या घरगुती पेयांचे सेवन करावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा व रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
गरजेनुसार कुलर, पंखे किंवा वातानुकूलन (एसी) यांचा वापर करावा. कामगारांना थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी योग्य सूचना द्याव्यात. गरोदर महिला, आजारी व्यक्ती, वयोवृद्ध आणि लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी.
उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे. शक्यतो दुपारच्या वेळेत श्रमाची कामे टाळावीत. चक्कर आल्यास किंवा अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. जनावरांनाही सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे.
‘हे करू नये’
दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे टाळावे. गडद, जाड किंवा घट्ट कपडे घालू नयेत. तापमान जास्त असताना शारीरिक श्रमाची कामे करू नयेत. उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे.
उष्माघात झाल्यास काय करावे?
उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीची तातडीने काळजी घेणे आवश्यक आहे. मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेये देऊ नयेत. बाधित व्यक्तीचे शरीर थंड करण्यासाठी ओल्या कापडाने पुसावे.
रुग्णाला ओआरएस, ताक, लस्सी किंवा लिंबूपाणी द्यावे. तसेच बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. उष्माघात गंभीर व जीवघेणा ठरू शकतो.
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर वाशिम यांनी केले आहे.
0 Response to "जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा इशारा उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी"
Post a Comment