ज्ञानभारत प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
ज्ञानभारत प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ
वाशिम , भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारशाचे जतन, दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने “ज्ञानभारत (Gyan Bharatam)” प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून देशभरात प्रारंभ करण्यात आला आहे.
भारताला हस्तलिखितांचा मोठा आणि वैविध्यपूर्ण वारसा लाभलेला असून पारंपरिक ज्ञान पिढ्यान्पिढ्या हस्तलिखितांच्या माध्यमातून प्रसारित होत आले आहे. मात्र, ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे एकत्रित संवर्धन व उपलब्धता आवश्यक ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ज्ञानभारत प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश देशातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, नोंदणी, संवर्धन, डिजिटलायझेशन आणि व्यापक प्रसार करणे हा आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने कोट्यवधी हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह (National Digital Repository) तयार करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा व्यक्तीकडेच राहणार असून इच्छेनुसार शासनाकडे सुपूर्द करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची भूमिका महत्त्वाची असून विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि हस्तलिखित संग्रहालयांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले कार्य पाहणार असून सहनोडल अधिकारी म्हणून अंजली दामळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात या प्रकल्पासाठी काही संस्थांची क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर येथील कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ तसेच पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था क्लस्टर केंद्र म्हणून, तर आनंद आश्रम संस्था आणि भारत इतिहास संशोधक मंडळ स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत.
सर्वेक्षणासाठी “Gyan Bharatam” हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित तसेच NCC, NSS स्वयंसेवक, विद्यार्थी आणि वारसा संवर्धन संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
जिल्हास्तरावर जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणे, जिल्हास्तरीय समित्या स्थापन करणे तसेच मंदिर, मठ, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहकांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्या जवळ काही हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्यांनी त्यांची माहिती “ज्ञानभारत” मोबाईल अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to "ज्ञानभारत प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ"
Post a Comment