महिला दिनविशेष लेख स्वप्न ते स्वावलंबन : ‘स्वरा गृह उद्योग’ची प्रेरणादायी वाटचाल
साप्ताहिक सागर आदित्य
महिला दिनविशेष लेख
स्वप्न ते स्वावलंबन : ‘स्वरा गृह उद्योग’ची प्रेरणादायी वाटचाल
शिक्षण घेतल्यानंतर स्वाभिमानाने जीवन जगता यावे, ही प्रत्येक महिलेची साधी आणि स्वाभाविक इच्छा असते. हीच इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘स्वरा गृह उद्योग’. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा देणारी ही यशोगाथा स्वाभिमान, परस्पर सहकार्य आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी म्हणावी लागेल.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाई येथील रहिवासी असलेल्या मंजुषा राजेंद्र ठाकरे या कारंजा येथील लोकसंचालित साधन केंद्राच्या उपाध्यक्ष आहेत. एम.ए. आणि बी.एड. असे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करायचा निर्धार केला. महिलांना रोजगाराची संधी मिळावी आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी ‘स्वरा गृह उद्योग’ या उपक्रमाची सुरुवात केली.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कारंजा येथील लोकसंचालित साधन केंद्रामार्फत नाबार्डच्या सहाय्याने ‘रूरल मार्ट’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. या माध्यमातून आपल्या केंद्रातून तयार होणारी किमान एक उत्पादित वस्तू विक्रीसाठी असावी, या उद्देशाने मंजुषा ठाकरे यांनी श्री स्वामी समर्थ महिला समूहातील चार-पाच महिलांना सोबत घेऊन ‘स्वरा हँडमेड पापड’ तयार करण्यास सुरुवात केली.
‘चव आपल्या घरची’ हे ध्येयवाक्य जपत शुद्धता, गुणवत्ता आणि पुरेसे प्रमाण यावर भर देत या उद्योगाची सुरुवात झाली. पहिल्याच वर्षापासून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला. मागणी वाढू लागल्याने उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ अपुरे पडू लागले. त्यामुळे २०२३ मध्ये उद्योगात आधुनिक यंत्रसामग्री बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून नवीन यंत्रसामग्री बसविण्यात आली आणि त्यानंतर उद्योगाची प्रगती झपाट्याने वाढू लागली. सुरुवातीला दिवसाला केवळ दहा किलो उत्पादन होत असताना ते अनेक पटींनी वाढले. ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पापडांसह विविध खाद्यपदार्थांचे उत्पादन सुरू करण्यात आले. आज उद्योगामध्ये दहा पेक्षा अधिक प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात.
विक्रीसाठी पारंपरिक जाहिरातींवर अवलंबून न राहता ग्राहकांशी थेट संपर्क साधण्यावर भर देण्यात आला. होम डिलिव्हरी पद्धतीमुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी जाणून घेणे सोपे झाले. ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादनात बदल करण्याची लवचिकता ठेवण्यात आली. तसेच मोठ्या जाहिराती करण्याऐवजी दरवर्षी शेकडो ग्राहकांना चवीसाठी सॅम्पल देण्याची पद्धत अवलंबली गेली. ‘वस्तूची चव ग्राहकाला आवडली तर तो परत येतोच,’ या विश्वासामुळे ग्राहकांचा प्रतिसाद सातत्याने वाढत गेला.
या यशस्वी वाटचालीदरम्यान २०२५ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त यशस्वी उद्योजिका म्हणून मंजुषा ठाकरे यांना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे स्वरा उद्योगाच्या संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित झाला.
याशिवाय स्वरा गृह उद्योगाच्या स्थापनेपासून सलग पाच वर्षे त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. लोकसंचालित साधन केंद्र उमरडा बाजार आणि अल्पसंख्यांक सीएमआरसी कारंजा यांच्या वतीनेही त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गावपातळीवर ग्रामपंचायत वाई यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत ‘अहिल्याबाई होळकर पुरस्काराने’ त्यांचा सन्मान केला.
२०२४ ते २०२६ या कालावधीत अनेक महिलांनी उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी स्वरा गृह उद्योगाकडे येण्यास सुरुवात केली. या माध्यमातून अनेक महिलांना उद्योगाची प्रेरणा मिळाली आणि त्यांना नव्या संधींचे दार उघडले.
पारंपरिक विक्री व्यवस्थेला पर्याय म्हणून ‘डायरेक्ट सेलिंग’ या तत्त्वावर चालणाऱ्या स्वरा गृह उद्योगाला २०२६ मध्ये आणखी एक सन्मान मिळाला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ‘महाविकास २०२६ – थेट विक्री परिषद’ अंतर्गत ‘आद्य’ पुरस्काराने उद्योगाचा गौरव करण्यात आला.
या प्रवासात अनेक अडचणी आणि आव्हाने आली, पण ‘अडचणी या सोडवण्यासाठीच असतात’ या विश्वासाने स्वरा उद्योगाची टीम सातत्याने पुढे जात राहिली. मंजुषा ठाकरे सांगतात, ‘मी जरी पुरस्कार स्वीकारत असले तरी त्यामागे अनेक महिलांचे परिश्रम आहेत. स्वरा गृह उद्योगाचे यश हे त्या सर्व महिलांचे आहे.’
स्वरा गृह उद्योगाचा उद्देश केवळ आर्थिक उलाढाल वाढवणे हा नसून ग्रामीण भागातील महिलांना उद्योगाची प्रेरणा देणे हा आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाने ग्रामीण भागात हजारो उद्योग उभे राहून लाखो महिलांना रोजगार मिळावा आणि आर्थिक स्वावलंबन निर्माण व्हावे, हीच या उपक्रमामागील खरी प्रेरणा आहे.
आज ‘स्वरा गृह उद्योग’ ही उद्योगसंस्था ग्रामीण महिलांच्या स्वाभिमान, सहकार्य आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी यशोगाथा कथा ठरली आहे.
– श्वेता पोटुडे-राऊत
जिल्हा माहिती अधिकारी,
वाशिम
0 Response to "महिला दिनविशेष लेख स्वप्न ते स्वावलंबन : ‘स्वरा गृह उद्योग’ची प्रेरणादायी वाटचाल"
Post a Comment