-->

जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात

जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात



साप्ताहिक सागर आदित्य 

 सर्वांनी निर्धारित मार्गदर्शक सूचनांचे व नियमावलीचे काटेकोर पालन करावे 


 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात


वाशिम, दि. २६ मार्च 

जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखण्याचा मूलभूत पाया आहे,  त्यामुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने नियमावलीचे काटेकोर पालन करत अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती संकलित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.


जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आज दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी तथा कारंजा उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रवीण भगत, जिल्हा समन्वयक ऋषीकेश पाथरे, शशांक रुखने आदी मान्यवर उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे बोलतांना म्हणाले की, जनगणना प्रक्रियेत वेळेचे आणि अचूकतेचे विशेष महत्त्व आहे. मागील तीन महिन्यांपासून जनगणनेची पूर्वतयारी सुरू असून यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने या प्रशिक्षणात गांभीर्याने सहभागी होऊन उद्भवणाऱ्या शंकांचे त्वरित निरसन करून घ्यावे. तसेच इन्स्ट्रक्शन मॅन्युअलचे वारंवार वाचन करून निर्धारित मार्गदर्शक सूचनांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


प्रास्ताविक करताना जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी सांगितले की, यंत्रणेतील टॉप-टू-बॉटम सर्व घटकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या विशेष प्रशिक्षण शिबिराला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे.प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. या शिबिरातून सक्षम, सजग आणि जबाबदार मनुष्यबळ तयार होऊन आगामी जनगणना अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


प्रशिक्षणादरम्यान जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगण्यात आली. डिजिटल साधनांचा वापर, मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलन, डेटा एंट्रीतील अचूकता आणि माहितीची गोपनीयता राखण्याचे नियम यावर विशेष भर देण्यात आला. तसेच प्रत्यक्ष क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण अधिक प्रभावी केले. प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष सरावाची संधी देण्यात आली. विविध परिस्थितींमध्ये कसे कार्य करावे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.


या शिबिरामुळे जनगणना प्रक्रियेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित होऊन आगामी जनगणना अधिक अचूक व प्रभावीपणे पार पाडता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणातून सहभागींच्या ज्ञानात व कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन वाघ यांनी केले, तर आभार सहाय्यक महसूल अधिकारी अतुल देशमुख यांनी मानले.


या प्रशिक्षणासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, जनगणना टेक्निकल असिस्टंट, गणनाकर्ते व पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article