-->

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या  समस्या तातडीने मार्गी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी



साप्ताहिक सागर आदित्य 

 समाधान शिबिरातून नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावूया 

     विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल


महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराला खेर्डा बु येथे भेट


जिल्ह्यात सर्वदूर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


वाशिम, दि.१४ मार्च  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या  समस्या तातडीने मार्गी लावून शासनाच्या सेवा लोकांपर्यंत सुलभ आणि वेळेत पोहोचतील यासाठी प्रशासनाने समन्वयातून काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले. त्या कारंजा तालुक्यातील खेर्डा बु येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व अभियान समाधान शिबिराला भेट देऊन आढावा घेत असताना बोलत होत्या.


यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, सहाय्यक आयुक्त राजीव फडके, तुकाराम टेकाडे, उपायुक्त संतोष कवडे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, तहसीलदार रवी महाले, गटविकास अधिकारी पुनम राणे, खेर्डा येथील उपसरपंच सिमाताई ढोके, माजी समाजकल्याण सभापती अशोक डोंगरदीवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


डॉ. सिंघल यांनी शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या महसूल विषयक अडचणी जाणून घेतल्या. विविध अर्ज व तक्रारींची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना प्रमाणपत्रे, नोंदी दुरुस्ती, जमीन संबंधित बाबी तसेच इतर महसूल सेवांचा लाभ जलद गतीने मिळावा यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय राहण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.


पुढे बोलतांना डॉ. श्रीमती सिंघल म्हणाल्या ,महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित महसूल विषयक कामांना गती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरांमधून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच विविध प्रमाणपत्रे व सेवांचा लाभ देण्यावर भर दिला जावा. या शिबिरांमुळे नागरिकांना महसूल कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवरच तत्काळ सोडविण्यात याव्यात, या उद्देशाने प्रशासनाकडून भरपूर प्रयत्न केले जावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.


प्र. जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले, महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या समाधान शिबिरांमुळे नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित प्रकरणे स्थानिक पातळीवर तातडीने निकाली काढण्यास मदत होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल प्रशासनाच्या कामकाजात अमुलाग्र बदल होत असून या माध्यमातून प्रशासन नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.


उपजिल्हाधिकारी श्री देवरे म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भूमीत महाराष्ट्रात  शिवजयंती पासून मंडळ  स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. शासनाच्या विविध विभागाच्या अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू आहेत व या योजनांची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवणे व या योजनांचा लाभ पात्र व्यक्तींना मिळवून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करणे या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे.  शिबिरांमधून महसूल विषयक अर्ज, तक्रारी व विविध प्रमाणपत्रांच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील प्रत्येकी एका महसूल मंडळात आज एकूण सहा शिबिरांचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये वाशिम तालुक्यातील राजगाव, रिसोड तालुक्यातील रिठद ,मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा , मानोरा तालुक्यातील शेंदुर्जना, मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा, आणि कारंजा तालुक्यातील खेर्डा बु या मंडळ स्तरावर समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली.


संपूर्ण जिल्ह्यातला सेवा वितरणाचा तपशील :


महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध महसूल सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. अभियानांतर्गत निकाली काढण्यात आलेले एकूण फेरफार १८८, ७/१२ मधील दुरुस्तीसंदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्ज १३८, १ हजार ११५ डिजिटल ७/१२,  ८अ उतारे ९४०, भूमी अभिलेख विभागामार्फत गावठाणातील घरांच्या जागेबाबत सनद देण्यात आल्या. यासोबतच ९८७ विविध प्रकारची प्रमाणपत्रे नागरिकांना वितरीत करण्यात आली. एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी १८६ अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून ७१ प्रकरणांवर गाव दप्तर अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे . अकृषक परवानगी दिलेल्या २१ प्रकरणांमध्येही कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावतीकरण  करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच काही प्रकरणांचे जागेवरच निराकरण करण्यात आले असून उर्वरित प्रकरणे संबंधित कार्यालयांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्यात आली.


कार्यक्रमाला महसूलसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, आशा व अंगणवाडी सेविका, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 Response to "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article