दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त राबवा
साप्ताहिक सागर आदित्य
दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त
राबवा
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
केंद्र संचालक व भरारी पथकांची आढावा सभा
दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या परीक्षा पूर्णतः पारदर्शक, शांत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी सर्व केंद्र संचालक, पर्यवेक्षक व भरारी पथकांनी शिक्षण मंडळाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही. उपद्रवी केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था व समन्वय यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी केंद्र संचालक व भरारी पथकांची आढावा सभा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
४२ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट
यंदा वाशिम जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ५६, तर बारावीच्या परीक्षेसाठी २२ हजार ३६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, एकूण ४२ हजार ४२५ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
सीसीटीव्हीद्वारे कडक देखरेख
परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, त्याद्वारे परीक्षेदरम्यान सतत देखरेख ठेवली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागामार्फत व्यापक तयारी करण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८८ परीक्षा केंद्रांवरील ८३५ वर्गखोल्यांमध्ये, तर बारावीच्या परीक्षेसाठी ७४ परीक्षा केंद्रांवरील ८३० वर्गखोल्यांमध्ये मंडळाच्या निर्देशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरू आहे.
उपद्रवी केंद्रांवर विशेष उपाययोजना
दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळाने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत उपद्रवी परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्ह्यात दहावीची १९ व बारावीची २८ अशी एकूण ४७ उपद्रवी परीक्षा केंद्रे असून, या ठिकाणी कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी अतिरिक्त दक्षता व कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
भौतिक सुविधांची पूर्वतयारी पूर्ण
सर्व परीक्षा केंद्रांवर विद्युत जोडणी, पंखे, दिवे तसेच इतर आवश्यक भौतिक सुविधांची पाहणी करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत अखंडित वीजपुरवठा राहावा, यासाठी जनरेटर किंवा इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे व प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी दिली.
एकूणच यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सभेस सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी तसेच उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
0 Response to "दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त राबवा"
Post a Comment