लेखी आश्वासनाने ‘आप’चे आंदोलन मागे
साप्ताहिक सागर आदित्य
लेखी आश्वासनाने ‘आप’चे आंदोलन मागे
मे. अजयदिप इन्फ्राकॉनला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव
वाशिम : नगर परिषद हद्दीतील कामांना वारंवार मुदतवाढ देऊनही, कामे पूर्ण न करणाऱ्या मे. अजयदिप इन्फ्राकॉन प्रा. लि. या कंपनीला काळ्या यादीत टाकून, दंडात्मक कारवाई करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने 21 जानेवारीपासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत, 23 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता यांनी मे. अजयदिप न्फ्राकॉन या कंपनीस काळ्या यादीत टाकण्यासह दंडात्मक कार्यवाहीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केला आहे. या लेखी आश्वासनामुळे आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले यांनी उपोषण मागे घेतले आहे.
वाशिम नगर परिषद हद्दीतील सिमेंट काँक्रीट रस्ते, पेवर ब्लॉक रस्ते तसेच डांबरीकरणाच्या रस्त्यांची कामे संबंधित उपविभागाअंतर्गत सुरू असून, ही कामे मे. अजयदिप इन्फ्राकॉन प्रा. लि., औरंगाबाद यांच्याकडून करण्यात येत आहेत. या रस्ते कामासाठीचा कार्यारंभ आदेश क्रमांक १५७१/निधी/दि. ०४/०३/२०२१ नुसार काम पूर्ण करण्याचा कालावधी ४०० दिवसांचा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार ही कामे ०७ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्याने ३० जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, या मुदतवाढीनंतरही संबंधित रस्ते कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर कंपनी काम पूर्ण करण्यास अकार्यक्षम असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, विकासकामांचा वेगही मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदार कंपनीस काळ्या यादीत टाकण्यासह दंडात्मक कार्यवाही करण्याचा प्रस्ताव तयार करून तो सक्षम प्राधिकाऱ्यांकडे निर्णयासाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन सा. बा. उपविभागाचे सहाय्यक अभियंता यांनी दिले. त्यामुळे आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले यांनी उपोषण मागे घेतले आहे. मात्र, यावर वेळेत कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरुपाच्या उपोषणाचा इशारा दिला आहे.
----
‘काम पूर्ण करण्यास अकार्यक्षम’
मुदतवाढीनंतरही संबंधित रस्ते कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर कंपनी काम पूर्ण करण्यास अकार्यक्षम असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीस काळ्या यादीत टाकण्यासह दंडात्मक कार्यवाही करण्याचा प्रस्ताव तयार सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
----
वरिष्ठ स्तरावरून वाढला दबाव
‘आप’च्यावतीने वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू होताच, वरिष्ठ स्तरावरून हालचालींना वेग आला. त्यामुळे अधीक्षक अभियंता अकोला, व कार्यकारी अभियंता अकोला व सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता, अमरावती यांच्याकडून तातडीने पत्रव्यवहार झाल्याचे दिसून आले.
----
0 Response to "लेखी आश्वासनाने ‘आप’चे आंदोलन मागे "
Post a Comment