-->

लेक लाडकी योजना   मुलींच्या सशक्त भविष्यासाठी  ठोस आधार

लेक लाडकी योजना मुलींच्या सशक्त भविष्यासाठी ठोस आधार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

लेक लाडकी योजना 

मुलींच्या सशक्त भविष्यासाठी  ठोस आधार


आजही समाजातील अनेक घटकांमध्ये मुलींच्या जन्माकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलगी म्हणजे ओझे नसून कुटुंबाचा आणि समाजाचा अभिमान आहे, ही जाणीव अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'लेक लाडकी योजना' १० ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींचा जन्म, शिक्षण आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.


लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे

मुलींच्या जन्माचे स्वागत होणे,

स्त्री भ्रूणहत्या रोखणे

मुलींच्या शिक्षणाला चालना देणे,

आर्थिक अडचणींमुळे शिक्षण खंडित होऊ न देणे मुलींमध्ये आत्मविश्वास व स्वावलंबन निर्माण करणे

ही योजना केवळ आर्थिक सहाय्यापुरती मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ ठरत आहे.


लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते. मुलीच्या जन्मानंतर, शाळेत प्रवेश, शिक्षणातील विविध टप्पे पूर्ण केल्यानंतर थेट लाभ देण्यात येतो. यामुळे पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळतो आणि मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहते.


मुलीचे शिक्षण हेच सक्षम समाजाचे खरे भांडवल आहे. ही बाब लक्षात घेऊन या योजनेत शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मुलगी नियमित शाळेत जात असल्यास आणि शिक्षण सुरू ठेवल्यासच पुढील लाभ दिला जातो. त्यामुळे शालेय गळती कमी होण्यास मोठी मदत होत आहे.


सामाजिक बदलाची दिशा 

लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. 'मुलगी म्हणजे लक्ष्मी'ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरू लागली आहे. ग्रामीण व शहरी भागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात आहे.


लेक लाडकी योजना ही केवळ एक सरकारी योजना नसून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. आज शिक्षण घेतलेली, आत्मनिर्भर झालेली मुलगी उद्याच्या समाजाची दिशा ठरवेल. शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यास स्त्री-पुरुष समानतेकडे एक मोठे पाऊल टाकले जाईल.


लेक लाडकी योजना ही मुलींच्या सन्मान, शिक्षण आणि सशक्तीकरणाची मजबूत पायाभरणी आहे. प्रत्येक कुटुंबाने या योजनेचा लाभ घ्यावा आणि 'लेक म्हणजे लाडकीच' ही भावना समाजमनात रुजवावी, हीच काळाची गरज आहे.


लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 


लाभार्थी मुलीचा जन्म दाखला,

पालकांचे आधार कार्ड,

रहिवासी दाखला ,

उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदारांकडून मिळालेले, वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे)

रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)

बँक खात्याचे तपशील (बँक पासबुकची पहिल्या पानाची छायाप्रत - आधारशी लिंक असणे आवश्यक)

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (आई/वडिलांचे)

शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र (शिक्षण टप्प्यावरील लाभासाठी)

वयाचा १८ वर्षांनंतरचा पुरावा (मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शेवटच्या हप्त्यासाठी)

लाभार्थी मुलीचे आणि आईचे संयुक्त छायाचित्र

अपत्य/मुलीच्या अविवाहित असल्याचा स्व-घोषणापत्र 


१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली मुलगी या योजनेसाठी पात्र आहे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे.

या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार पहिलीत ६ हजार, सहावीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपयांचे अनुदान टप्प्याटप्प्याने मिळते.


अर्ज जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद मध्ये जमा करता येतील. 


 

लेक लाडकी योजनेची प्रगती


जिल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत

वाशिम शहरी प्रकल्प – १ हजार २२५

कारंजा प्रकल्प – ७०४

मालेगाव प्रकल्प –  ७२४

मंगरुळपिर प्रकल्प –  ६७२

मानोरा प्रकल्प –  ५६४

रिसोड प्रकल्प –  ७५४

वाशिम ग्रामीण प्रकल्प –  ८६८

म्हणजेच एकूण ५ हजार ५११ लाभार्थ्यांना प्रत्येकी पहिला ५ हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. उर्वरित १ हजार ८७८ अर्ज प्रक्रियेत आहेत त्यांनाही लवकरच लाभ वितरित केला जाईल.

— संजय गणविर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,

महिला व बाल विकास विभाग,

जिल्हा परिषद, वाशिम


जिल्ह्यातील योजनेच्या निकषात बसणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की , त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुलींच्या जन्माचे उत्सव साजरे करावेत. 

_ योगेश कुंभेजकर , 

जिल्हाधिकारी वाशिम


 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थी यांनी आपले अर्ज थेट अंगणवाडी सेविका यांचेकडे जमा करून पर्यवेक्षिका यांचेमार्फत ऑनलाईन करून घ्यावे व पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

— अर्पित चौहान

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, वाशिम


संकलन :


जिल्हा माहिती कार्यालय 

वाशिम

0 Response to "लेक लाडकी योजना मुलींच्या सशक्त भविष्यासाठी ठोस आधार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article