पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योग्य रीतीने वापरला जावा हे प्रमुख ध्येय जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योग्य रीतीने वापरला जावा हे प्रमुख ध्येय
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
रब्बी सिंचन नियोजन २०२५-२६
सिंचन अभियान आढावा बैठक
रब्बी हंगामात उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योग्य रीतीने वापरला जावा, हे आपलं प्रमुख ध्येय आहे. हवामानातील अनिश्चिततेचा विचार करता सिंचनाचे नियोजन वेळेवर आणि नीटनेटके करणे गरजेचे आहे. विभागांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक माहिती आणि मदत वेळेवर उपलब्ध करून द्यावी. माती परीक्षण, पिकांचा कल जाणून घेणे, सिंचन साधनांची दुरुस्ती आणि पाण्याचा पुनर्वापर याकडे विशेष लक्ष दिल्यास उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायद्याचे ठरेल अशी कार्यपद्धती ठेवून सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रभावी कृती आराखडा राबवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
रब्बी हंगाम २०२५-२६ साठी सिंचन नियोजन आणि पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर बोलत होते.
बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र जाधव, कार्यकारी अभियंता कारंजा जेवळीकर, उपकार्यकारी अभियंता निखील चव्हाण, उपविभागीय अधिकारी नमन डाखोडे, सहाय्यक अभियंता भास्कर वळवी, कृषी उपसंचालक हिना शेख, मुख्यमंत्री फेलो संकेत नरूटे, कनिष्ठ अभियंता अश्विनी राठोड आदी उपस्थित होते.
१५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या आवर्तनपूर्व कामांचा आढावा घेताना जलसंपदा व कृषी विभागांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी समन्वय समिती गठित करण्याचे ठरविण्यात आले. पिकांचा कल कळण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण, जमिनीची प्रतवारी व माती परीक्षण, तसेच आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्यक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. सिंचन यंत्रणांची देखभाल व दुरुस्ती, पिकांचे परिभ्रमण, दुहंगामी व उन्हाळी पिकांची तयारी, तसेच उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर यासंबंधी बाबींवरही चर्चा झाली.
१५ नोव्हेंबरनंतर प्रत्यक्ष सिंचन आवर्तन सुरू झाल्यानंतर पिकांचे नियोजन व व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, रोग–किड नियंत्रण आणि शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. अशासकीय संस्थांचा सहभाग वाढविण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.विभागांनी केलेल्या प्राथमिक तयारीसह आगामी काळातील कृषीविषयक कामांवर सविस्तर चर्चा झाली.
कृषी उपसंचालक हिना शेख यांनी कृषी विभागाचे व्हॉट्सअॅप गट, यूट्युब चॅनल आणि महाविस्तार एआय ऍप या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या इतर माध्यमांबद्दल माहिती देत तंत्रज्ञानाचा वापर करून मार्गदर्शन अधिक सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचे सांगितले.
बैठकीला उपस्थित अधिकारी आणि विभागांनी रब्बी हंगामात पाण्याचा सुयोग्य वापर, नियोजनबद्ध सिंचन आणि शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळावे यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात येईल असे सांगितले. बैठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
0 Response to "पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योग्य रीतीने वापरला जावा हे प्रमुख ध्येय जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर "
Post a Comment