शेतकरी बांधवांनो....! “ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत तुमचा फार्मर आयडी काढलाय का?”
साप्ताहिक सागर आदित्य
शेतकरी बांधवांनो....!
“ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत तुमचा फार्मर आयडी काढलाय का?”
वाशिम, जिल्ह्यात कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून, शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्यात येत आहेत. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे.
काय आहे ऍग्रीस्टॅक?
ऍग्रीस्टॅक ही डिजिटल शेतीची क्रांतिकारक संकल्पना आहे, जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि शासन यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडते. या माध्यमातून शेतीसंबंधी सर्व माहिती अचूक, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होते.
फार्मर आयडी म्हणजे काय?
हा एक अद्वितीय ओळख क्रमांक असून तो ऍग्रीस्टॅक अंतर्गत तयार केला जातो. यात शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, जमीन मालकी (सातबारा उतारा) यांसारखी माहिती समाविष्ट असते.
फार्मर आयडीची आवश्यकता का आहे?
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना पुढील सुविधा मिळतात :
प्रधानमंत्री किसान, पिक विमा, नुकसान भरपाई, महाडीबीटीसारख्या योजनांचा थेट लाभ,
डिजिटल कर्ज वितरण जलदगतीने,
किमान आधारभूत किंमत नोंदणी व पारदर्शक व्यवहार, विविध शासकीय योजनांमध्ये अडथळेविना प्रवेश
आधुनिक तांत्रिक सहाय्य :
फार्मर आयडीच्या माध्यमातून हवामान अंदाज, मृदा आरोग्य माहिती, पिक सल्ला यांसारख्या अचूक आणि वैयक्तिक सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध होतात.
अतिउत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन
शेतकरी नवीन तंत्रज्ञान, योग्य सरकारी मदत आणि डिजिटल माहितीचा उपयोग करून अधिक उत्पादन आणि नफा मिळवू शकतात.
“शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी व पारदर्शकपणे मिळावा, यासाठी ऍग्रीस्टॅक प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या डिजिटल उपक्रमामुळे शेती क्षेत्रात क्रांती घडणार असून प्रत्येक शेतकऱ्याचा डेटा सुरक्षित, अचूक व सुलभ होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावा.
_योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी वाशिम
ऍग्रीस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेली रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा.
शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपला ऍग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी त्वरित तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0 Response to "शेतकरी बांधवांनो....! “ऍग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत तुमचा फार्मर आयडी काढलाय का?” "
Post a Comment