"मतदान हा माझा हक्क” रिसोडमध्ये मतदान जनजागृती रॅली उत्साहात
साप्ताहिक सागर आदित्य
"मतदान हा माझा हक्क”
रिसोडमध्ये मतदान जनजागृती रॅली उत्साहात
वाशिम, दि. १२ नोव्हेंबर आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आज रिसोड शहरात भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश शेवदा यांच्या सहकार्याने घेण्यात आली.
रॅलीची सुरुवात नगर परिषद, रिसोड येथून करण्यात आली. “एक मत – उज्ज्वल भविष्य”, “मतदान हा माझा हक्क”, “लोकशाही बळकट करूया – मतदान जरूर करूया” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
या रॅलीमध्ये श्री. शिवाजी हायस्कूल, भारत माध्यमिक शाळा, तसेच डॉ. आल्लामा इकबाल उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी हातात फलक, बॅनर, व मतदानाविषयी संदेश असलेले घोषवाक्ये घेत शहरात जागृती केली. शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
या उपक्रमात स्वीप (SVEEP) अभियानातील कर्मचारी रामेश्वर प्रल्हाद जायभाये, राजेंद्र पट्टेबहाद्दूर, ममता नवघरे व सुषमा देशमुख यांनी विशेष योगदान दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी सांगितले की, लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करणे ही अत्यंत आवश्यक जबाबदारी आहे. मतदानाचा टक्का वाढविणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट आहे.
रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक प्रक्रियेत सर्वांच्या सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to " "मतदान हा माझा हक्क” रिसोडमध्ये मतदान जनजागृती रॅली उत्साहात"
Post a Comment