
सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
साप्ताहिक सागर आदित्य
सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
विकास, सुरक्षा व गतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाची हाक
वाशिम, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, अपघात नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हा प्रशासनाचा ठरलेला अजेंडा असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी स्पष्ट केले. त्यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात पार पडलेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकास आराखडा, प्रलंबित प्रकल्प आणि सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण,आरडीसी विश्वनाथ घुगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते.
बैठकीत पूरग्रस्त भागातील मदतकार्य, रस्त्यांची युद्धपातळीवरील दुरुस्ती, अपघातप्रवण ठिकाणांचे पुनरावलोकन, वाहतूक व्यवस्थापन, चेतावणी फलक आणि सिग्नल बसविणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.
तसेच, जमीन भूसंपादन, सौर कृषी पंप योजना, कौशल्य विकास, भूमी अभिलेख, जिल्हा नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नवोदय विद्यालय, जलसंधारण व जलसंपदा आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. अपूर्ण पुलांची कामे, रस्त्यांचे पुनर्बांधणी प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधा विकासासाठी जलद गतीने पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस म्हणाल्या, प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे ओळखून वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने काम केले, तर नागरिकांना दिलासा मिळेल आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल.
0 Response to "सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश "
Post a Comment