
विकासकामे, दुरुस्ती व नागरिकांचे रक्षण हाच जिल्हा प्रशासनाचा अजेंडा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
विकासकामे, दुरुस्ती व नागरिकांचे रक्षण हाच जिल्हा प्रशासनाचा अजेंडा
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न
विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा
वाशिम, : विकासकामांना गती, अपघातांना लगाम आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य हाच अजेंडा घेऊन जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली दि.२५ जुलै रोजी पार पडलेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विविध विभागांच्या कामाचा आढावा घेत, नियोजनबद्धतेने व गुणवत्तेने कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध यंत्रणांचा प्रशासकीय समन्वय व जनहिताचा आढावा घेण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांची उपस्थिती होती. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, रोहयो उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर , उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) दादासाहेब दराडे यांच्यासह इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
तसेच काही यंत्रणा प्रमुख दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाल्या, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याचबरोबर रस्त्यांची झालेली पडझड आणि वाढती अपघातांची संख्या, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान लक्षात घेता तात्काळ पंचनामे करून आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी निर्देश दिले की, पूरग्रस्त भागांतील नागरिकांना तातडीने मदत पोहोचावी, रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर व्हावी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे.
खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत, बांधकाम विभाग व एनएचएआय यांना तात्काळ कृती आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले. अपूर्ण पुलांचे काम तत्काळ पूर्ण करावे, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, वाहतूक व्यवस्थापन, चेतावणी फलक, अंधारात असलेली धोकादायक ठिकाणे आणि अपघात प्रवण क्षेत्रांची सुधारणा यावर भर देण्याच्या सूचनाही परिवहन, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागासह इतर यंत्रणांना दिले.
0 Response to "विकासकामे, दुरुस्ती व नागरिकांचे रक्षण हाच जिल्हा प्रशासनाचा अजेंडा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "
Post a Comment