
अपघात नियंत्रण आणि पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज
साप्ताहिक सागर आदित्य
अपघात नियंत्रण आणि पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
वाशिम, जिल्ह्यातील पूरपरिस्थिती, रस्त्यांची झालेली पडझड आणि वाढती अपघातांची संख्या या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्रामकुमार जगताप तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलतांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस म्हणाल्या, जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून हे चिंतेचे कारण आहे. अपघात कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करावे. वाहतुकीचे योग्य नियोजन, रस्त्यांची दुरुस्ती, संकेतस्थळांवर सूचना फलक लावणे, व जनजागृती मोहिमा राबवणे आवश्यक आहे.
बैठकीत पूरग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा व तात्पुरती निवास व्यवस्था यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त रस्त्यांचा अहवाल सादर केला असून, तातडीच्या दुरुस्ती कामांकरिता निधीची मागणी करण्यात येणार आहे. परिवहन विभागाने अपघातप्रवण ठिकाणी विशेष तपासणी मोहिम राबवावी, असे सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी बांधकाम विभाग व एनएचआय विभागाला निर्देश दिले की, जिल्ह्यातील अपूर्ण पुलांचे काम तात्काळ पूर्ण करावे. काही भागात नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पुलांचे काम लांबणीवर टाकणे हे सार्वजनिक हिताच्या विरोधात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आणि अपूर्ण पायाभूत सुविधा हे त्यामागील प्रमुख कारणे आहेत. संबंधित विभागांनी तात्काळ कृती आराखडा सादर करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत.
बैठकीत पूरग्रस्त भागात आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीवरही सविस्तर चर्चा झाली.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
पूर किंवा अपघातप्रवण भागात अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवास करू नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
बैठकीच्या शेवटी नागरिकांना सुरक्षिततेसंबंधी सूचना देत सांगितले की, आपत्ती काळात अफवांपासून दूर राहा, प्रशासनाशी सहकार्य करा आणि नियंत्रण कक्षाशी संपर्कात रहा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
0 Response to "अपघात नियंत्रण आणि पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज "
Post a Comment