विकास कामांना गती देण्यासाठी पंचायत विभागाचा कालबद्ध कार्यक्रम उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहू यांची कारंजा येथे सभा.
साप्ताहिक सागर आदित्य
विकास कामांना गती देण्यासाठी पंचायत विभागाचा कालबद्ध कार्यक्रम
उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहू यांची कारंजा येथे सभा.
ग्रामविकासाच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत विभागाच्या वतीने दोन महिन्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू यांनी कारंजा पंचायत समितीमध्ये (दि. ६) सभा घेऊन याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी पूनम राणे, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास घुगे, जिल्हा क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल काळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अमोल कापसेआणि विस्तार अधिकारी संजय भगत यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ग्रामपंचायत स्तरावरील कामांना गती देण्यासाठी दोन महिन्याचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पंचायत विभागाला दिली आहे.
यामध्ये एक ग्रामपंचायत- एक पिठाची गिरणी, ग्रामपंचायतची कर वसुली 50% पर्यंत करणे, आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत शंभर टक्के निधी वसूल करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे मॉडेल करणे, एक गाव एक सार्वजनिक शोष खड्डा ही संकल्पना राबविणे आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत 70 टक्के पर्यंत खर्च करणे या सात कामांचा समावेश आहे.
कारंजा पंचायत समिती मध्ये तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची बैठक घेऊन याबाबत सूचना देण्यात आल्या. यानंतर उर्वरित पाचही पंचायत समितीमध्ये या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू यांनी दिली.
10 ग्राम पंचायतीमध्ये पीठ गिरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
बैठकीमध्ये कारंजा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीमध्ये पिठाची गिरणी सुरू करण्याची माहिती संबंधित आठ ग्रामसेवकांनी दिली. यामध्ये गायवळ, तुळजापूर, माळेगाव, खामगाव, मनभा, खेर्डा, वाई, पारवा, सोहळ, बेलखेड या गावांचा समावेश आहे.
0 Response to "विकास कामांना गती देण्यासाठी पंचायत विभागाचा कालबद्ध कार्यक्रम उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहू यांची कारंजा येथे सभा."
Post a Comment