भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण
रिसोड (10 ऑगस्ट ): माजी खासदार तथा दि आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत प्राथमिक मराठी शाळेत जय पारितोषिक योजनेअंतर्गत बक्षीस वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारत प्राथमिक मराठी शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप घाटे, गटशिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे, भारत माध्यमिक विद्यालयचे प्राचार्य संजय भांडेकर, मुख्याध्यापक मधुकर शिंदे, माजी मुख्याध्यापिका शीलाताई उकळकर, मुख्याध्यपिका किरणताई दुबे,स्वप्निल धांडे आदी मन्यावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापिका किरणताई दुबे आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या की "विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांच्या संकल्पनेतून जय पारितोषिक योजनेची सुरुवात करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. भाऊसाहेबांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असतो."
यांनतर जय पारितोषिक योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर म्हणाल्या की, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे ही संस्था आज जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्था बनली आहे. तसेच अपयशाने खचून न जाता प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ध्येयपूर्तीसाठी नेहमीच महत्वाकांक्षी राहून जिद्द, चिकाटी, अभ्यासूवृत्ती जोपसावी."असे प्रतिपादन केले.
तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या की, "विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी दी आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख सदैव प्रयत्नशील असतात. गुणवंत विद्यार्थी ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. तसेच पालक व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजेत ."
कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख या प्रसंगी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की," प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध स्वरूपाच्या सुप्त क्षमता असतात. त्या क्षमतांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशाचे शिखर गाठण्यासाठी मेहनत,जिद्द व चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करावा."
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे,स्वप्नील धांडे आदी मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धनंजय वाघ यांनी केले तर पंजाबराव देशमुख यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .सदर कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण "
Post a Comment