प्रधानमंत्री मातृ वंदना योजना: २ जुलैपर्यंत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम
साप्ताहिक सागर आदित्य
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना:
२ जुलैपर्यंत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम
पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
आरोग्य विभागाचे आवाहन
वाशिम, माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहीत करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रीत राहावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केलेली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजेनचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी मंत्रालय, महिला व बालकल्याण विभाग, नवी दिल्लीद्वारे १८ जून ते २ जुलै या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयात पहिले अपत्य व दुसरे अपत्य फक्त मुलगी असलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी २ जुलै पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोहीम सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग ठोंबरे यांनी दिली.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० राज्यात ९ ऑक्टोंबर २०२३ ला लागु झाली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्हयातील आशा वर्कर व आरोग्य सेविका मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रांमध्ये ऑनलाईन नविन लाभार्थी नोंदणी व पोस्टाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडणेबाबत अभियान राबविण्यात येणार आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शासनाचे अधिसुचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यांसाठी ५ हजार रुपयांचा दोन टप्प्यात तसेच दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास ६ हजार रुपयांचा लाभ एकाच टप्प्यात थेट आधार लिंक असलेल्या खात्यात जमा केल्या जातो. ही योजना शासकीय सेवेत तसेच खाजगी सेवेत किंवा ज्या मातेला ६ महिन्याची प्रसुती रजा मंजूर आहे अशा माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.
जिल्हयातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीम.बुवनेश्वर एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.विजय काळे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभासाठी
ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये ८ लाखापेक्षा कमी आहे. तहसिलदाराचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक ,अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला. लाभार्थीचे नावाचे जात प्रमाणपत्र आवश्यक
ज्या महिला अंशत: (४० टक्के) किंवा पूर्ण अपंग आहेत. (दिव्यांग जन)
बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला (बीपीएल रेशनकार्ड मध्ये लाभार्थीचे नाव असणे आवश्यक)
आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय) अंतर्गत महिला लाभार्थी.
ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला
किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
आशा कार्यकर्ती (लाभार्थी स्वत: अंगणवाडी सेविका/मदतनीस, आशावर्कर असल्याचे प्रमाणपत्र),राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत शिधापत्रिकाधारक महिला लाभार्थी.
(लाभार्थीचे नावाने असलेले रेशन कार्ड) यापैकी कोणत्याही एका ओळखपत्र पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
२ जुलै २०२४ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेदरम्यान आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यासोबत पात्र लाभार्थ्याने संपर्क साधून पोर्टलवर अर्ज भरावा असे आवाहन जिल्हा कार्यक्रम समन्वयक राखी पिंपरकर, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यांनी केले . मोहीमेदरम्यानचा अहवाल व कार्यक्रमाची निगराणी करण्याची जबाबदारी श्रीमती पिंपरकर व जिल्हा कार्यक्रम सहाय्यक अक्षय वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
0 Response to "प्रधानमंत्री मातृ वंदना योजना: २ जुलैपर्यंत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम "
Post a Comment