
समृध्दीवर अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांचे समुपदेशन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुढाकार
साप्ताहिक सागर आदित्य
समृध्दीवर अपघात टाळण्यासाठी
वाहन चालकांचे समुपदेशन
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुढाकार
वाशिम, : हिंद्हृदयसमाट बाळासाहेब ठाकरे नागपुर-शिर्डी समृध्दी महामार्गावर डिसेंबर २०२२ पासून नियमित वाहतुक सुरु करण्यात आली आहे. परंतु वाहन चालकांच्या चुकीमुळे तसेच वाहनाच्या स्थितीमूळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये मुख्यत: वाहन चालकांकडून विहीत मर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालविणे, लेनची शिस्त न पाळणे, खराब व गुळगुळीत झालेले टायर वापरणे, रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करणे आदी मुख्य बाबी दिसुन आल्या आहे.
या महामार्गावरील अपघातांची संख्या कमी करण्याकरीता परिवहन विभागाच्या वतीने वाहन चालकांचे समूपदेशन करुन त्यांना वाहतुक नियमांची माहिती देण्यात येत आहे. तसेच मोटार वाहन नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांविरुध्द व वाहन चालकांविरुध्द मोटार वाहन कायदयातील तरतृदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परिवहन विभागाने नागपुर व शिर्डी येथील प्रवेश व बाहेर निघण्याच्या पाँईटवर तसेच या महामार्गावर वर्धा, कारंजा (वाशिम) बुलढाणा, जालना, औरंगाबाद येथे २४ तास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांचे समुपदेशन करणे, दंडात्मक कारवाई करणे, लेनची शिस्त न पाळणे, वाहन अनधिकृतपणे रस्त्यावर उभे करणे, वाहनाचे टायर खराब असल्यास वाहन चालकास परत पाठविणे, वाहनाचा फिटनेस विधीग्राहय नसल्यास तसेच वाहनाची तांत्रिक स्थिती ठिक नसल्यास कारवाई करणे व वाहनाच्या मागील बाजूस रिफलेक्टर टेप बसविणे आदींबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
एखादया वाहनचालकांने विहीत मर्यादेपेक्षा (मोटार कार १२० कि.मी./तास, जड वाहन ८० कि.मी./तास) वाहन चालविल्याचे आढळून आल्यास रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्वयंचलित सिस्टिमव्दारे त्या वाहनांची नोंद होते. त्या वाहनाला पुढील टोलनाक्यावर अडविण्यात येते. त्या वाहनधारकाचे त्याठिकाणी समुपदेशन करुन पुढे मार्गस्थ करण्यात येते.
१८ एप्रिल रोजी वाशिम येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने 32 वाहनांचे समुपदेशन केले. एका वाहनाचे टायर खराब असल्यामुळे प्रवेश नाकारला. 2 वाहनांना रिफ्लेक्टर टेप बसविण्यात आले. 3 वाहनांना लेनची शिस्त न पाळल्याबद्दल, 3 वाहनावर मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्याबद्दल आणि 5 वाहनांवर लेन कटींग केल्याबद्दल वाहन चालकाची समुपदेशन करण्यात आले. वाशिमचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रेयस सरागे व ममता इंगोले यांनी वाहन चालकांचे समुपदेशन केले.
0 Response to "समृध्दीवर अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांचे समुपदेशन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पुढाकार"
Post a Comment