स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन
मुंबई, : ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून त्याअनुषंगाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या विक्री दालनातून राष्ट्रध्वज विकत घेतले.
दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिकानी सहभागी होऊन देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केले. या अभियानात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. या अभियानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होऊन प्रत्येक नागरिक या अभियानाशी जोडला जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
_मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राष्ट्रध्वजासह सेल्फी काढून घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. मंत्रालयातील अधिकारी तसेच समस्त कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अक्षरशः जणू घेरावच टाकला होता. प्रत्येकाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत तिरंगा ध्वज घेऊन सेल्फी काढायची होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील सर्वांच्या इच्छेला मान देत, प्रत्येकापाशी थांबत सेल्फी काढत होते. यावेळी त्रिमूर्ती प्रांगणातले सगळे वातावरण तिरंगामय झालं होते. भारत माता की जय आणि जय हिंद अशा घोषणांनी मंत्रालय दणाणून गेले होते._*
यावेळी मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी महिला बचत गटाच्या विक्री दालनातून विकत घेतलेले राष्ट्रध्वज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. तसेच यावेळी महिला बचत गटाच्या महिलांनी स्वत: तयार केलेले राष्ट्रध्वज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेट दिले.
या कार्यक्रमास मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे नोडल अधिकारी अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज रक्षाबंधन असल्याने महिला बचत गटाच्या महिलांनी आणि सलाम बॉम्बे या संस्थेच्या विद्यार्थिनींने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राखी बांधून हा सण साजरा केला.
0 Response to "स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन"
Post a Comment