जंतनाशक मोहीम राबविण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य/
राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेची तयारी पुर्ण
25 व 29 एप्रिल रोजी जंतनाशक मोहिम
मोहिम राबविण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न
वाशिम - राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाडयांमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळया देऊन दोनदा घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मातीतुन प्रसार होणाऱ्या कृमीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहीमेमधील अंतर ६ महिन्यापेक्षा जास्त नसावे. म्हणुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम २५ एप्रिल आणि २९ एप्रिल २०२२ रोजी मॉपअप दिन राबविण्यात येत आहे. या मोहीमेची अंमलबजावणी शाळा व समुदाय स्तरावर करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना शाळा व समुदायस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जंतनाशक मोहीमेची अंमलबजावणी २५ एप्रिल २०२२ या राष्ट्रीय जंतनाशक दिनी व २९ एप्रिल २०२२ मॉप अप दिन याप्रमाणे करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आज २२ एप्रिल रोजी जंतनाशक दिन मोहीमेच्या जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभागामधील प्रमुख अधिकारी तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
सभेमध्ये श्रीमती पंत यांनी या मोहीमेची यशस्वी अंमलबजावणी होण्याकरीता आरोग्य, शिक्षण व महिला व बालकल्याण विभागाचा समन्वय असणे आवश्यक असल्याच्या सुचना दिल्या. तसेच जिल्हयातील लाभार्थी संख्येनुसार आरोग्य संस्थांना जंतनाशक गोळया वाटपाबाबत, प्रशिक्षण, प्रसिध्दी साहित्य वाटपाबाबत आढावा घेण्यात आला. राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचनेनुसार आरोग्य कर्मचारी यांनी लाभार्थ्यांना गोळी खाऊ घालावी, जेणेकरुन कोणत्याही प्रकारचा एईएफआय होणार नाही याची काळजी घेण्याचे सुचित केले. खानपानाव्दारे विविध प्रकारचे जंतु लहान मुलांच्या पोटात जातात. या जंतुमुळे अन्नातील पौष्टीक तत्व मुलांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे मुलांचा शारीरिक विकासही खुंटतो. विष्ठेव्दारे जंत बाहेर पडु लागतात. त्यामुळे मुल आजारी राहते. जंतदोष कशामुळे होतो यावर समितीच्या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार २५ एप्रिल रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनी जिल्हयातील १ ते १९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांनी जंतनाशक गोळी खावी व २५ एप्रिल रोजी ज्यांना जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत, त्यांनी आपल्या गावातील आशा सेविकेकडे जंतनाशक गोळयांची मागणी करावी. असे आवाहन श्रीमती पंत यांनी केले.
आरोग्य विभागामार्फत दरवर्षी जंतनाशक गोळयांच्या वितरणाची मोहीम राबविली जाते. वर्षातुन दोन वेळा शाळांमध्ये जंतनाशक गोळयांचे वितरण केले जातात. त्यासाठी संबंधीत यंत्रणेला प्रशिक्षणही दिले जाते तसेच गोळया दिल्यानंतर मुलांना काय त्रास होऊ शकतो, त्यासाठी काय करावे या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात येते. २५ एप्रिल ते ५ मे २०२२ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीमेस जन आंदोलनाचे स्वरुप प्रदान करुन मोहीम १०० टक्के यशस्वी करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Response to "जंतनाशक मोहीम राबविण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न"
Post a Comment