-->

साखरा गावाच्या व शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे महत्वपुर्ण योगदान - वसुमना पंत

साखरा गावाच्या व शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे महत्वपुर्ण योगदान - वसुमना पंत


साप्ताहिक सागर आदित्य/
साखरा गावाच्या व शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे महत्वपुर्ण योगदान - वसुमना पंत                                                                                                              
वाशिम :
साखरा येथील शाळा ही जिल्हा परिषदेची आहे याचा मला अभिमान वाटतो. या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवली आहे. खाजगी शाळांपेक्षा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उत्तम आहे. गावाच्या व शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे महत्वपुर्ण योगदान आहे. साखरा गावाचा व शाळेचा विकास हा सुक्ष्म नियोजनातून झाला आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

               आज १९ एप्रिल रोजी साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्रीमती पंत बोलत होत्या. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती महक स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजेश शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्य.) रमेश तांगडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे, साखरा सरपंच श्रीमती चंद्रकला इंगळे, शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव भालेराव तसेच अन्य मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

               श्रीमती पंत म्हणाल्या, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यामुळेच ही शाळा यशस्वी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय शाळेची इमारत पुर्ण झाल्यावर एक नाविन्यपुर्ण ओळख या शाळेची निर्माण होईल. जिल्हयातील प्रत्येक शाळा ही साखरा येथील शाळेसारखी असली पाहिजे. भविष्यात या शाळेतून आयएएस व आयपीएस या सारखे अधिकारी तयार होतील याचा मला विश्वास असल्याचे सांगून श्रीमती पंत यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगीतले.

               प्रास्ताविकातून मुख्याध्यापक भालेराव यांनी १२ वर्षापूर्वी या शाळेची पटसंख्या ५४ होती. आज ती ६५० इतकी झाली आहे. शाळेत अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येतात. हे उपक्रम बघण्यासाठी दरवर्षी २ ते ३ हजार लोक या शाळेला भेट देतात. आंतरराष्ट्रीय शाळेचे बांधकाम पुर्ण झाल्यावर या शाळेमधून ५ हजार विद्यार्थी एकाचवेळी शिक्षण घेतील. येथे निवासाची सुध्दा व्यवस्था राहणार असून तसेच अनेक प्रकारच्या सुविधा भविष्यात या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. या शाळेच्या संपूर्ण बांधकामासाठी १०० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

               शिक्षक गजानन निचळ यांनी शाळेविषयीचे सादरीकरण केले. श्रीमती पंत यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला साखरा व परिसरातील गावाचे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शिक्षीका भावना चव्हाण यांनी मानले.  

                                                                                                                                                 

0 Response to "साखरा गावाच्या व शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे महत्वपुर्ण योगदान - वसुमना पंत "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article